जारावंडी (एटापल्ली):
एटापल्ली तालुक्यातील दोलंदा येथे वाघाच्या हल्ल्यात हरी बोहरण वड्डे (वय ५७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि वन विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात आज जारावंडी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रमक होत रास्तारोको आंदोलन केले.
शिवसेना(उ.बा.ठा ) जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी,अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दोलंदा व जारावंडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा वावर वाढला असून पाळीव जनावरांवर हल्ले होत होते. यासंदर्भात १९ जुलै २०२६ रोजीच वन विभागाला निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्याने निष्पाप हरी वड्डे यांना आपला जीव गमवावा लागला, असा थेट आरोप आंदोलकांनी केला आहे.
यावेळी प्रशासनाला निवेदन सादर केले यामध्ये
मृत हरी बोहरण वड्डे यांच्या कुटुंबाला शासनाने जाहीर केलेली ₹२५ लाखांची आर्थिक मदत कोणतीही प्रशासकीय दिरंगाई न करता तातडीने बँक खात्यात जमा करण्यात यावी.कुटुंबातील एका पात्र वारसाला शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाकडून तातडीने ठोस हमी देण्यात यावी.पूर्वसूचना मिळूनही दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार वन अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्यासोबतच जारावंडी व परिसरात दहशत पसरवणाऱ्या वाघाचा तात्काळ शोध घेऊन गस्त व ट्रॅप कॅमेरे वाढवून ठोस सुरक्षा उपाययोजना कराव्यात.
या रास्तारोको आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. “वन विभागाने केवळ आश्वासने न देता मृत कुटुंबाला तातडीने मदत द्यावी आणि परिसरात सुरक्षितता निर्माण करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम व ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनानंतर वन विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.




