अहेरी महिला व बाल रुग्णालयातील रिक्त पदांवरून नगरसेवक अमोल मुक्कावार यांचे आमरण उपोषण सुरू.

0
2

अहेरी:

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय आणि प्रशासकीय पदांवर नियुक्त्या न झाल्याच्या निषेधार्थ अहेरी नगर पंचायतीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. अहेरी येथील राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात सुरू झालेल्या या उपोषणाने आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. रुग्णालयातील सर्व रिक्त पदे जोपर्यंत भरली जात नाहीत, तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहील आणि आपण उपोषणाची जागा सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा नगरसेवक मुक्कावार यांनी दिला आहे.लक्षणीय बाब म्हणजे, अहेरी महिला व बाल रुग्णालयाचे उद्घाटन सुमारे एक वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे रुग्णालया जनतेला समर्पित करण्यात आला होता. कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा यांसह आदिवासी व दुर्गम भागातील हजारो नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती.मात्र, उद्घाटनाला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही रुग्णालयात डॉक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका (नर्सिंग स्टाफ) आणि इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त पडलेली आहेत. परिणामी, हे रुग्णालय आजही आपल्या पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या अवाढव्य इमारतीचा अपेक्षित लाभ सामान्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्थानिक जनतेत तीव्र असंतोष

या भागातील गरोदर महिला, नवजात बालके आणि बाल रुग्णांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अहेरी आणि आसपासच्या दुर्गम आदिवासी भागातून सुमारे ८० ते १०० किलोमीटरचे अंतर पार करून महिला व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी रुग्णालयात पोहोचतात, परंतु पुरेसा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अपेक्षित सुविधा मिळू शकत नाहीत. यामुळे स्थानिक जनतेत प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.

याच मुद्यावरून नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी सोमवारी महिला व बाल रुग्णालय परिसरात ‘ताला ठोको’ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत अमोल मुक्कावार यांच्यासह चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने नगरसेवक मुक्कावार यांनी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.

अमोल मुक्कावार म्हणाले, “जोपर्यंत महिला व बाल रुग्णालयातील सर्व रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही. हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, संपूर्ण अहेरी परिसरातील माता, भगिनी आणि बालकांच्या आरोग्याच्या हक्काचा लढा आहे.”

आता हे आंदोलन केवळ अहेरीपुरते मर्यादित राहिले नसून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रातील लोक या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले हे रुग्णालय अखेर कधी पूर्णपणे कार्यान्वित होणार आणि शासन-प्रशासन जनतेच्या या महत्त्वाच्या मागणीवर कधी सकारात्मक निर्णय घेणार, हाच आता सर्वात मोठा प्रश्न आहे.सध्या अहेरीच्या राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात सुरू असलेल्या या आमरण उपोषणाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता सरकार आणि प्रशासन या आंदोलनाची किती गांभीर्याने दखल घेते आणि अहेरीच्या जनतेला कधी न्याय मिळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.