जागतिक रक्तदान दिनानिमित्य उद्या अहेरीतील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात भव्य रक्तदान शिबिर.

0
1

अहेरी:

“माणुसकीचा एक थेंब! रक्तदान करा, जीवन वाचवा!” या उदात्त संदेशाला केंद्रस्थानी ठेवून, जागतिक रक्तदान दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उद्या, रविवार दिनांक १४ जून २०२६ रोजी अहेरी येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अहेरी येथील पोलीस उप मुख्यालय, प्राणहिता येथे पार पडणार आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार रक्तदान

हे शिबिर उद्या रविवारी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत निरंतर सुरू राहणार आहे. या शिबिराचे आयोजन गडचिरोली पोलीस दलाने केले असून, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व रक्तकेंद्र गडचिरोली, उपजिल्हा रुग्णालय व रक्तकेंद्र अहेरी, तसेच शालिनीताई मेघे रक्तपेढी, नागपूर यांचे विशेष तांत्रिक व वैद्यकीय सहकार्य लाभले आहे.

सामाजिक बांधिलकीतून आयोजन

नक्षलग्रस्त व दुर्गम भागात कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासोबतच गडचिरोली पोलीस दल नेहमीच विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबवण्यात अग्रेसर राहिले आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, या पवित्र हेतूने पोलीस दलाने या भव्य शिबिराचे पाऊल उचलले आहे.

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

या शिबिरात पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासोबतच स्थानिक नागरिक, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब कोणाचे तरी आयुष्य वाचवू शकतो, याचे भान ठेवून अहेरी परिसरातील नागरिकांनी या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, अशी विनंती पोलीस प्रशासनाने केली आहे.