सतीश निषाद खून प्रकरण:समलैंगिक’ नव्हे, तो तर ब्लॅकमेलिंगचा जीवघेणा खेळ! लाखो रुपयांच्या वसुलीसाठीच मित्राचा क्रूर खून मृतकाच्या कुटुंबाचा पत्रकार परिषदेत खळबळजनक खुलासा.

0
23
Oplus_16908288

आलापल्ली/नागेपल्ली:

सोशल मीडियावरील मैत्रीतून झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक खुलासा समोर आला आहे. काही प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाला ‘समलैंगिक विवाहाचा नकार’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते, मात्र हा दावा मृताच्या कुटुंबीयांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. आरोपी हा मुलीचा हुबेहूब आवाज काढून मृतकाला गेल्या अनेक दिवसांपासून ब्लॅकमेल करत होता आणि याच ब्लॅकमेलिंग व आर्थिक लुटीतून ही क्रूर हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप मृताच्या भावाने आणि नातेवाईकांनी केला आहे.आज मृतकाचा भाऊ सारोज निषाद, मोठे भाऊ पवन बाथो आणि चुलत भाऊ ब्रजकुमार निषाद यांनी नागेपल्ली येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.

मुलीच्या आवाजात इन्स्टाग्रामवर जाळे; लाखो रुपयांची लूट

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इन्स्टाग्रामवर एका मुलीच्या नावाने खोटे अकाऊंट (Fake Profile) तयार केले होते. केवळ चॅटिंगच नव्हे, तर मुलीचा आवाज काढून त्याने मृतकाशी फोनवर जवळीक साधली. या खोट्या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने मृतकाला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर विविध प्रकारे बदनामीची भीती दाखवून, वारंवार ब्लॅकमेल करत मृतकाकडून लाखो रुपये उकळले.

फोन ब्लॉक केल्याने आरोपी थेट आलापल्लीत दाखल

सततचा मानसिक त्रास आणि आर्थिक लुटीला कंटाळून अखेर मृतकाने आरोपीचे फोन नंबर ब्लॉक केले. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने थेट मृतकाच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना संपर्क साधून त्रास देण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, मृतकाचा शोध घेत आरोपी थेट आलापल्ली-नागेपल्ली परिसरात येऊन धडकला.

घटनेच्या आदल्या दिवशी ‘माफी’, दुसऱ्या दिवशी जंगलात नेऊन गेम!

हत्या होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी मृतक आणि आरोपी यांच्यात भेट झाली होती. यावेळी मृतकाने आरोपीला “पुन्हा असे ब्लॅकमेल करू नको, मला त्रास देऊ नको” असे स्पष्ट शब्दांत समजावून सांगितले. त्यावेळी आरोपीने वरकरणी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व समझोता केला. मात्र, आरोपीच्या मनात आधीपासूनच खुनाचा भयंकर कट शिजत होता.दुसऱ्या दिवशी आरोपी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाला. त्याने गोड बोलून मृतकाला आपल्या गाडीत बसवले. गाडी थेट जंगलाच्या दिशेने नेऊन, निर्जन स्थळी आरोपीने मृतकावर चाकूने सपासप वार करत त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

बँक ट्रान्झॅक्शन आणि चॅटिंगचे सबळ पुरावे सादर

“हा कोणताही समलैंगिक संबंधांचा प्रकार नसून निव्वळ आर्थिक फसवणूक, सायबर क्राईम आणि ब्लॅकमेलिंगचा क्रूर खेळ आहे,” असा ठाम दावा कुटुंबीयांनी केला आहे.

आपल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ मृतकाच्या भावाने पत्रकार परिषदेत आरोपीसोबत झालेले मोबाईल चॅटिंग, पैसे ट्रान्सफर केल्याचे बँक ट्रान्झॅक्शन आयडी आणि इतर अनेक तांत्रिक पुरावे माध्यमांसमोर सादर केले.

माध्यमांच्या ‘त्या’ वृत्तामुळे कुटुंब दुखावले; फाशीची मागणी

कोणतीही सखोल चौकशी न करता, केवळ सनसनाटी (Sensation) निर्माण करण्यासाठी काही माध्यमांनी या प्रकरणाला ‘समलैंगिक संबंधांचे’ रूप दिले. यामुळे आधीच तरुण मुलगा गमावलेल्या आमच्या कुटुंबाच्या भावना तीव्रतेने दुखावल्या गेल्या आहेत, अशी तीव्र नाराजी नातेवाईकांनी व्यक्त केली.हे प्रकरण वरकरणी दिसते त्यापेक्षा खूप मोठे असून, यामागे एखादे मोठे ‘ब्लॅकमेलिंग रॅकेट’ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी आणि नराधम आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा द्यावी, अशी आर्त मागणी मृतकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.