अहेरी(प्रतिनिधी):
नेंडर नियतक्षेत्रात दुर्मिळ वन्यप्राण्यांची आणि पक्ष्यांची शिकार करणाऱ्या टोळीवर रविवारी रात्री वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना चामोर्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. या टोळीतील एक आरोपी अल्पवयीन असून त्याची सुनावणी बाल न्याय मंडळासमोर होणार आहे.
नेमकी घटना काय?
१९ एप्रिल २०२६ रोजी आलापल्ली वनपरिक्षेत्रातील नेंडर नियतक्षेत्रात (खंड क्र. १०) वन कर्मचारी गस्तीवर असताना शिकारीचा हा प्रकार उघडकीस आला. या शिकारी टोळीने महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, मोठी उडणारी खार, राज्यपक्षी हरियाल आणि मॅगपाय रॉबिन यांची शिकार केली होती. वनविभागाने तत्परता दाखवत घटनास्थळावरून आरोपींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ५ दुचाकी आणि शिकारीसाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
यांच्यावर झाली कारवाई:
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनील किशन नरोटी, रामा घिस्सा धुर्वा, बबलू दानू आतलामी, नागेश टेकराम हिचामी, देसु मुन्सी गावडे, सेतू गोंगलू नरोटी, बालाजी तोंदे पदगा, चेंडू गिस्सा धुर्वा, रमेश चैता आतलामी, विलास दानु आतलामी आणि बंडू फकरी तलांडी (सर्व राहणार उडेरा, ता. एटापल्ली) यांचा समावेश आहे.
अल्पवयीन आरोपीची वेगळी सुनावणी:“पकडण्यात आलेल्या १२ जणांपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. त्यामुळे कायद्यानुसार त्याची सुनावणी बाल न्याय मंडळांतर्गत (Juvenile Justice Board) होणार आहे
.कडक कायद्यान्वये गुन्हा दाखल:आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा (प्राथमिक वनगुन्हा क्र. ०५/२०२६) दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.सदर कारवाई मुख्य वनसंरक्षक श्री. जी. पी. नरवणे, उपवनसंरक्षक सौ. दिपाली तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.




