अहेरी:-
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण), मुंबई यांच्या सामाजिक दायित्व निधी अंतर्गत रोल (ROLE) संस्थेला प्राप्त झालेल्या 30 लाखांच्या आर्थिक मदतीतून अहेरी येथे उभारण्यात आलेल्या पाच वैद्यकीय सेवा केंद्रांचा लोकार्पण सोहळा रविवार, 19 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अहेरी तालुक्यातील चिंचगुडी येथील रोल अहेरी केंद्रात झालेल्या या कार्यक्रमात चल-चिकित्सालय वाहन, रुग्णवाहिका वाहन, पॅथॉलॉजी केंद्र, फिजिओथेरपी केंद्र आणि रुग्ण-साहित्य सेवा केंद्र या पाचही सेवांचे उद्घाटन महापारेषणच्या नागपूर झोनचे मुख्य अभियंता श्री. सतिशजी अणे यांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांना आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि जवळ उपलब्ध व्हाव्यात हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सोहळ्याला महापारेषणच्या नागपूर झोनचे अधिक्षक अभियंता श्री. नितीन अंगाईतकर, AGM HR श्री. महेश सावंत, चंद्रपूर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विलास रंगारी, प्रशासन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अनिल बागडे, अति. कार्यकारी अभियंता श्री. सागर कुंदोजवार, उप कार्यकारी अभियंता सौ. दीपीका हिवराळे आणि सौ. निता साळवे यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
द रिसर्च ऑर्गनायझेशन फॉर लिव्हींग एन्हान्समेंट (ROLE), अहेरी या संस्थेच्या माध्यमातून या सेवा आता आदिवासी रुग्णांसाठी कार्यरत झाल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. धिरज (रमेश) पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन सतीश देशमुख यांनी केले. संस्थेचे सचिव श्री. गोविंद सारडा यांनी प्रास्ताविक केले तर आभार डॉ. मितालीअक्का आत्राम यांनी मानले.




