आलापल्ली वनविभागाचा सर्जिकल स्ट्राईक! १२ शिकारी जेरबंद; शेकरूसह दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष जप्त

0
9

अहेरी:

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाने रविवारी सायंकाळी एक मोठी कारवाई करत शिकारी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक मोहिमेत तब्बल १२ शिकाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूसह अनेक दुर्मिळ वन्यजीवांचे अवयव आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा

आज १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास आलापल्लीच्या जंगलात काही संशयित शिकारी लपून बसल्याची खात्रीशीर माहिती वनविभागाला मिळाली होती. माहिती मिळताच गस्ती पथकाने वेगाने हालचाली करत संबंधित परिसरात सापळा रचला. वनविभागाची चाहूल लागताच शिकाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून १२ जणांच्या मुसक्या आवळल्या.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

शिकाऱ्यांच्या ताब्यातून वनविभागाने खालील वन्यजीव आणि साहित्य जप्त केले आहे:

  • शेकरू: ०४ (पारध केलेले)

  • उडणारी खार: ०१

  • हरियाल पक्षी: ०१ (महाराष्ट्राचा राज्य पक्षी)

  • घुबड: ०१

  • इतर: विविध वन्यजीवांचे अवशेष आणि शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य.

कडक कायदेशीर कारवाई

ताब्यात घेतलेल्या आरोपींवर भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे शिकार करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

“वन्यजीव संरक्षणासाठी वनविभाग सदैव तत्पर आहे. जंगलातील अशा अवैध कृत्यांविरुद्ध आमची मोहीम यापुढेही अधिक तीव्र राहील. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ वनविभागाला द्यावी.”

गौरव गणवीर, वनपरिक्षेत्र अधिकारी, आलापल्ली.

प्रशासकीय चमू:ही यशस्वी कारवाई आलापल्लीच्या उपवनसंरक्षक सौ. दिपाली तळमले व उपविभागीय वन अधिकारी श्री. शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर, क्षेत्र सहाय्यक पुनमचंद बुद्धावार वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली.