अहेरी :
भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या ‘महाराष्ट्र दर्शन’ शैक्षणिक सहलीचा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय श्री. बबलू भैयाजी हकीम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले वा यावेळी विभागीय अध्यक्षा आदरणीय सौ. शाहीन ताई हकीम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शैक्षणिक सहलीच्या नियोजनामध्ये संस्थेचे आदरणीय प्राचार्य श्री. शाहिद शेख सर यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक विविधतेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी ही सहल आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले
सहलीचा शुभारंभ पारंपरिक विधीने करण्यात आला. आदरणीय श्री. बबलू भैयाजी हकीम साहेब व सौ. शाहीन ताई हकीम यांच्या हस्ते बस पूजन, श्रीफळ फोडून आणि हिरवी झेंडी दाखवून सहलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बहुसंख्य पालक, शिक्षकवर्ग, शिक्षिका, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी वातावरण उत्साह, आनंद आणि शुभेच्छांनी भरून गेले होते.
ही महाराष्ट्र दर्शन सहल एकूण आठ दिवसांची असून अहेरी येथून प्रारंभ करून यवतमाळ, लोणार, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अलिबाग, जंजिरा, रायगड, कोल्हापूर, नांदेड मार्गे पुन्हा अहेरी येथे परतण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक स्थळे, किल्ले, समुद्रकिनारे, विज्ञान-ऐतिहासिक स्मारके तसेच महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण वारसा प्रत्यक्ष अनुभवण्याची अनोखी संधी यावेळी मिळणार आहे.
वनवैभव शिक्षण मंडळाच्या सततच्या प्रोत्साहनामुळे अशा उपक्रमांना चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षण अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी या सहलीचा उपयोग होणार असल्याबाबत पालक व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे प्राचार्य शेख सर यांनी सांगितले. संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शुभेच्छा देत सहल आनंददायी व ज्ञानवर्धक ठरो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या.




