मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या अहेरीतील महिला व बाल रुग्णालयाची वर्षभरातच दुरवस्था; पहिल्याच पावसात गळती, २९ जूनला ‘ताला ठोक’ आंदोलन.

0
11

अहेरी (गडचिरोली):

दक्षिण गडचिरोलीतील आरोग्य सेवा बळकट करण्याच्या उद्देशाने अहेरी येथे कोट्यवधी रुपये खर्चून महिला व बाल रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या पालक जिल्ह्यात आणि त्यांनीच उद्घाटन केलेल्या या रुग्णालयाची अवघ्या काही महिन्यांतच डिसेंबर २०२५ मध्ये लोकार्पणनंतर दैन्यावस्था झाली आहे.या रुग्णालयात मंजूर असलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरण्यात यावीत, अन्यथा २९ जून रोजी रुग्णालयाला कुलूप ठोकून (ताला ठोक) आंदोलन केले जाईल आणि ३० जूनपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा अहेरी नगर पंचायतीचे नगरसेवक अमोल सुधाकर मुक्कावार यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २२ जून रोजी निवेदन सादर केले आहे.

पहिल्याच पावसाळ्यात ‘बांधकामाचे’ पितळ उघडे; प्रसूती गृहात पाणीच पाणी

यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात या रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाची गुणवत्ता चव्हाट्यावर आली आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या महिला प्रसूती गृह (लेबर रूम) आणि व्हरांड्यामध्ये छतातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या दर्जात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तडजोड करण्यात आली आहे काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. पहिल्याच पावसात इमारतीला गळती लागल्याने रुग्णांच्या, विशेषतः नवजात बालकांच्या आणि प्रसूतीसाठी आलेल्या मातांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, “रुग्णांच्या जिवाशी असा खेळ खेळण्याचा अधिकार दिला कोणी?” अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून या निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

१६ पैकी १५ पदे रिक्त; रुग्ण उपचाराविना वाऱ्यावर

इमारतीची दुरवस्था एकीकडे असताना दुसरीकडे रुग्णालयात डॉक्टरांचा तीव्र तुटवडा आहे. शासन निर्णयानुसार या रुग्णालयासाठी एकूण १६ पदे मंजूर आहेत. यामध्ये:

  • वैद्यकीय अधीक्षक (गट-अ) – १ पद

  • वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतिशास्त्र (गट-अ) – १ पद

  • वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ज्ञ (गट-अ) – १ पद

  • वैद्यकीय अधिकारी बधिरीकरण तज्ज्ञ (गट-अ) – १ पद

  • बधिरीकरण तज्ज्ञ – २ पदे

  • वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूतिशास्त्र (गट-३) – ३ पदे

  • वैद्यकीय अधिकारी (गट-ब) – ५ पदेपरंतु, या १६ मंजूर पदांपैकी सद्यस्थितीत रुग्णालयात फक्त एकच बालरोग तज्ज्ञ कार्यरत असून, उर्वरित सर्व १५ पदे रिक्त आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञच उपलब्ध नसल्याने या भव्य रुग्णालयाचा माता-भगिनींना कोणताही फायदा होत नाहीये.

उपजिल्हा रुग्णालयावर ताण कायम

नवे रुग्णालय सुरू झाल्याने अहेरी उपविभागातील रुग्णांचे हाल कमी होतील अशी आशा होती. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे रुग्णांना पूर्वीप्रमाणेच अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी जावे लागत आहे. परिणामी, तेथील गर्दी आणि रुग्णांचा त्रास उलट अधिक वाढला आहे.

आंदोलनाचा इशारा

प्रशासनाने या गंभीर समस्यांची दखल घेऊन २८ जून २०२६ पर्यंत या रुग्णालयातील सर्व रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी केली आहे. ही मुदत पाळली न गेल्यास २९जूनला ताला ठोको आंदोलन छेडण्यात येईल

तर ३० जून २०२६ पासून राजे विश्वेश्वरराव महाराज चौक येथे आमरण उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.

कोट्यवधींच्या इमारतीची गळती आणि डॉक्टरांचा अभाव यामुळे अहेरी परिसरातील जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, आता शासन व प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.