गडचिरोली:25ऑक्टोबर
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सुरू असलेल्या ‘एक गाव, एक वाचनालय’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत वांगेतुरी येथे 73 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांनी ग्रंथदिंडीत सहभागी होऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
आज, 25/10/2025 रोजी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या सुसज्ज वाचनालयाचे उद्घाटन पार पडले. गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या अधिकारी व अंमलदारांनी तसेच स्थानिक नागरिकांनी श्रमदान आणि लोकवर्गणीतून हे आधुनिक वाचनालय साकारले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम, जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार तसेच महिला-पुरुषांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्या बौद्धिक कलागुणांना वाव देणे आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक वाचनाची ओढ निर्माण करणे या उद्देशाने चालवण्यात येत आहे.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी गावातील प्रमुख मार्गावरून भव्य ‘ग्रंथदिंडी’ काढण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करून तसेच पारंपरिक वाद्य वाजवून उत्साहाने सहभाग घेतला. या माध्यमातून पुस्तक आणि वाचनाप्रती आवड आणि सन्मान निर्माण करण्याची जनजागृती करण्यात आली. लोकार्पण सोहळ्याला 500 हून अधिक नागरिक उपस्थित होते.
या वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, बैठक व्यवस्थेसाठी टेबल, खुर्च्या, तसेच विविध विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सुविधेमुळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग वाढवण्यास मदत होणार आहे.
सन 2023 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाने आजवर 73 वाचनालये स्थापन केली आहेत. यापूर्वीच्या 72 वाचनालयांचा लाभ 8,500 पेक्षा जास्त युवक-युवती व नागरिकांना झाला असून, त्यातून एकूण 205 विद्यार्थी शासनाच्या विविध विभागांमध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे, गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या प्रभावी नागरी कृती उपक्रमांमुळे मागील पाच वर्षात जिल्ह्यातून माओवादी संघटनेत एकही तरुण-तरुणी भरती झालेली नाही, ही बाब लक्षणीय आहे.
‘सर्वांगीण विकासासाठी पोलीस दल कटिबद्ध’: पोलीस अधीक्षक
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी विद्यार्थ्यांना वाचनालयाचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “या वाचनालयातून अनेक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय क्षेत्रात यावे आणि त्यांचे भविष्य उज्वल व्हावे, हाच या निर्मितीमागचा उद्देश आहे. गडचिरोली पोलीस दल केवळ माओवादाविरुद्ध लढत नसून जिल्ह्याच्या नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील कटिबद्ध आहे.”
यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., असिस्टंट कमांडण्ट सिआरपीएफ 191 बटालियन श्री. मनोज कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी (हेडरी) श्री. योगेश रांजणकर, पोस्टे वांगेतुरीचे प्रभारी अधिकारी सपोनि. श्री. दिलीप खडतरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.




