नागेपल्ली स्मशानभूमीच्या जागेवरून वाद, दोन गटांत तुंबळ हाणामारी, 11 जणांवर गुन्हा दाखल.

0
2

अहेरी:15सप्टेंबर

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी शहराला लागून असलेल्या नागेपल्ली गावात रविवारी धक्कादायक घटना घडली आहे. गावातील स्मशानभूमीच्या जागेवर काही  वराहपालकांनी अतिक्रमण केल्याने, अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या गावकऱ्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली.अहेरी पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी 11 लोकांवर गुन्हा दाखल असून त्यापैकी 4 जणांना ताब्यात घेण्यात  आले आहे तर बाकी फरार आहे त्यांचा शोध सुरु असल्याची माहीती पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरून आलेल्या काही व्यावसायिकांनी बेकायदेशीरपणे वराहपालन सुरू केले होते. रविवारी गावातील काही लोक एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत गेले असता, अतिक्रमण करणाऱ्या  अतिक्रमण धारकांनी त्यांना अडवले. यामुळे दोन्ही गटांत जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत काही गावकरी जखमी झाल्याचे समजते.”काही वेळाने हा वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. यात अनेक जण   जखमी झाले आहेत.”

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते. गेल्या दोन वेळा येथील झालेले अतिक्रमण हटवीन्यात आले मात्र, काही लोकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत या जागेवर पुन्हा अतिक्रमण केले.
या घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. यामुळे गावात शांतता राखली जाईल, अशी अपेक्षा आहे.