गडचिरोली: राज्यात नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल,विकासापासून वंचित अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 111 वर्षाच्या आजीने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याने मतदाना प्रति निरुत्साह असलेल्या साठीं एक मोठी प्रेरणा देणारी बाब आहे.विशेष म्हणजे ह्या आजी ने उस्फुर्त पणे लोकसभेत सुद्धा मतदान केले होते.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे.मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत एका १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले.नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वयोवृद्ध आजीने मतदान करून नवमतदारांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे त्या आजींचे नाव असून त्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता.
निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र ,काही मतदार मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला. ते मतदार आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. त्यात फुलमती बिनोद सरकार या आजींचा देखील समावेश होता.
लोकशाहीच्या उत्सवात तब्बल १११ वय असलेल्या या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान करणे ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला.एवढेच नव्हेतर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले हे विशेष.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शाल देऊन केले स्वागत
फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले.त्यांनतर शालेय विद्यार्थी,गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले.त्यांनतर आजीने उत्साहात मतदानाचा हक्क बजावला.त्यानंतर अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती बिनोद सरकार यांना शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.




