गडचिरोली:
संघर्षाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या गडचिरोलीतील १०० आत्मसमर्पित व्यक्तींसाठी बंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाची अभ्यास भेट एका नव्या जीवनप्रवासाची दिशा देणारी ठरली आहे. ३ ते १३ सप्टेंबरदरम्यान आयोजित या उपक्रमातून या तरुणांना आत्मचिंतन, मानसिक शांतता आणि सकारात्मक सामुदायिक जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
हा उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या सहकार्याने तसेच लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संदीप पाटील आणि गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
ध्यान, योग आणि सुदर्शन क्रियेतून मानसिक परिवर्तन
३ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयातून रवाना झालेल्या या समूहाने आश्रमात ध्यान, योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रियेच्या सत्रांमध्ये भाग घेतला. सुदर्शन क्रियेदरम्यान अनेक सहभागी भावूक झाले. कोणतेही भाषण न देता केवळ श्वासावर केंद्रित केलेल्या या शांत क्षणांनी त्यांच्या मनातील जुन्या वेदना आणि ताणतणाव हलका करण्यास मदत केली.
श्री श्री रविशंकर यांचे मार्गदर्शन व ग्रामविकासाचा धडा
या दौऱ्यात सहभागींनी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्याशी थेट संवाद साधला. शांतता, धैर्य आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करत आपली ऊर्जा सेंद्रिय शेती, जलसंधारण, गोशाळा संवर्धन आणि ग्रामविकास यांसारख्या विधायक कामांमध्ये लावण्याचे आवाहन गुरुदेवांनी केले.
तसेच आश्रमातील विविध प्रकल्पांची पाहणी करताना, “आपल्या गावात जलसंधारण आणि सेंद्रिय शेती कशी राबवता येईल? स्थानिक तरुणांना रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध करता येतील?” अशा प्रश्नांद्वारे सहभागींनी भविष्यातील नवनिर्माणात रस दाखवला.
१०० सहभागींपैकी सुमारे ४० टक्के व्यक्ती सध्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये कार्यरत आहेत, तर उर्वरित जण शेती आणि समाजाभिमुख व्यवसायांचे पर्याय शोधत आहेत. गडचिरोलीत परतलेल्या या तरुणांचा हा प्रवास केवळ एका आश्रमाच्या भेटीपुरता मर्यादित न राहता, स्वाभिमान, शांतता आणि उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकणारा ठरत आहे.



