गडचिरोली पोलीस दलाचा पुढाकार: ‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत आत्मसमर्पित माओवाद्यांचा अहेरीत भव्य जनजागरण मेळावा.
अहेरी:
गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन सभागृहात” प्रोजेक्ट संजीवनी” अंतर्गत गुरुवारी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस अधीक्षक एम.रमेश, अहेरी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्षवर्धन,अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) सुनील मोहिते, अहेरी उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत चांदेवार, जीमलगट्टा उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मडावी,सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलतांना पोलीस अधीक्षक एम.रमेश म्हणाले,2005 पासून शासनाने माओवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली होती तेव्हापासून 861 माओवादी शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात आले आहे.त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि ओळखपत्र मिळवून देण्यासाठी सोबतच अहेरी उपविभागीय स्तरावर जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यासोबतच आत्मसमर्पण केलेल्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी देण्यात येत आहे.आता पूर्वी प्रमणे भीतीचे वातावरण राहिलेले नाही त्यामुळे पोलीस प्रशासनासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी जनजागरण मेळाव्यातुन प्रयत्न होत आहे.त्यासाठी तुमचे सहकार्य पाहिजे असे ते म्हणाले.
त्यासोबतच मुख्य प्रवाहात सन्मानाणे जगण्यासाठी या त्यासाठी जनजागरण मेळावा ही सुरुवात आहे.जनतेच्या हितासाठी अडीअडचणी साठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर आहे. जिल्हा आता नक्षलमुक्त झाला असल्याने त्यांच्या नावावर चुकीच्या गोष्टी खपवून घेतली जाणार नाही.
महाराष्ट्र शासनाने एक योजना जाहीर केली आहे.पूर्वी चकमकीत व इतर ठिकाणी पोलिसांकडून लुटलेले शस्त्र व पुरून ठेवलेले शस्त्रांची माहिती देणाऱ्यास 24 तासात बक्षीस देण्याची योजना त्यांनीं जाहीर केली .या योजनेत माहिती देणाऱ्या खबऱ्याची ओळख गुप्त ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आत्मसमर्पण केलेल्या माजी नक्षलवाद्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष पुनर्वसन व मार्गदर्शन मेळाव्यात विविध शासकीय सेवा, पुनर्वसन योजना, कागदपत्रांची पूर्तता आणि वैद्यकीय तपासणी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली.
आत्मसमर्पणानंतर शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी, प्रलंबित प्रकरणे, कागदपत्रांची पूर्तता आणि जमीन वाटपाशी संबंधित प्रश्नांची नोंद घेऊन संबंधित विभागांशी तातडीने समन्वय साधला जाईल .
यावेळी पोलिस अधीक्षकांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात आभा कार्डचे वितरण करण्यात आले.
मुख्य प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असून, हा जनजागरण मेळावा एका नव्या आणि सन्मानजनक आयुष्याची सुरुवात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.




