सुरजागड लोह खनिज वाहतुकीत स्थानिकांवर अन्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष घालणार काय? आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेयर असोसिएशनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे

0
1

गडचिरोली:.

सुरजागड येथील लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (माईन्स) मध्ये स्थानिक वाहतूकदारांना डावलून बाहेरच्या जिल्ह्यातील व राज्यातील वाहतूकदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेयर असोसिएशनने केला आहे. या अन्यायाविरोधात असोसिएशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औपचारिक निवेदन पाठवण्यात आले असून, पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नक्षलवादी हल्ल्याचा फटका सहन करूनही कंपनीकडून अवहेलना

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सुरजागड प्रकल्प सुरू होण्यापूर्वी शासन, प्रशासन आणि कंपनीने स्थानिक बेरोजगारांना रोजगारात प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक स्थानिकांनी आपल्या जमिनी आणि घरे गहाण ठेवून कर्जावर जड वाहने खरेदी केली. काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी स्थानिकांची ७० ते ८० वाहने जाळली, ज्याचे कोणतेही भरपाई किंवा मदत कंपनीकडून मिळाली नाही. तरीही स्थानिकांनी प्रकल्पाचे काम पुढे नेण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कंपनीला पाठिंबा दिला.

बाहेरच्या दलालांचे स्तोम आणि स्थानिकांची अडवणूक

आता वाहतूक पूर्णपणे सुरळीत झाल्यावर लॉयड मेटल्स आणि त्रिवेणी अर्थ मुव्हर्स प्रा. लि. या कंपन्या स्थानिकांना नवनवीन अटी लावून वाहतुकीपासून वंचित ठेवत आहेत. इतर जिल्ह्यातील व राज्यातील वाहतूकदारांना प्राधान्य दिले जात असून, स्थानिक वाहतूकदारांना सर्व गंतव्यस्थानांचे आदेश न देता दलालांमार्फत कमिशन देऊन काम करण्यास भाग पाडले जात आहे. सध्या कंपनीने स्थानिक ट्रान्सपोर्ट युनियनच्या गाड्यांची कोणतीही पूर्वसूचना न देता संख्यात्मक कपात केली असून, स्थानिकांची एकही गाडी लोड होणार नाही अशी भूमिका घेतल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.

त्यांनी केलेल्या मागण्या मध्ये स्थानिकांच्या गाड्यांवरील कपात तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे वाहतूक पूर्ववत सुरू करावी.,स्थानिक वाहतूकदारांना सर्व गंतव्यस्थानांसाठी (Destinations) लोडिंगमध्ये प्रथम प्राधान्य द्यावे. स्थानिकांच्या नवीन वाहनांना प्राधान्याने वाहतुकीत सामावून घ्यावे, स्थानिक मालवाहतूकदारांच्या समस्या निवारणासाठी कंपनीतर्फे एका जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.आणि बेरोजगार झालेल्या कामगारांना त्वरित पुन्हा कामावर घ्यावे. अश्या आशयाच्या आहेत.

“स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणल्यामुळे शेकडो वाहनचालक, मालक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून स्थानिकांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा आंदोलनाचा इशारा आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेयर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

आलापल्ली ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या या आरोपींवर लॉयड्स मेंटल्स कंपनी कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

या बाबतीत त्यांचा पक्ष जाणून घेऊन लवकरच प्रतिक्रिया प्रकाशित करू.