गडचिरोली, दि. १८ जून २०२६ :
गडचिरोली जिल्ह्यातील पाण्याअभावी त्रस्त, आदिवासी, दुर्गम व सिंचन सुविधांपासून अनेक वर्षे वंचित असलेल्या शेतकरी बांधवांच्या जीवनात आर्थिक समृद्धीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या उद्देशाने राज्य शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील चार मोठ्या उपसा सिंचन योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मान. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संवेदनशील, विकासाभिमुख आणि शेतकरीहिताच्या नेतृत्वामुळे हा निर्णय शक्य झाला असून, यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही माहिती माजी खासदार तथा भारतीय जनता पक्ष अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी गडचिरोली येथील आपल्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा
डॉ. अशोक नेते यांनी सांगितले की, गडचिरोली हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील आदिवासीबहुल व दुर्गम जिल्हा असून, येथील शेतकऱ्यांना सिंचन सुविधांच्या अभावामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिलासा मिळावा, शेती उत्पादनात वाढ व्हावी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळावे या उद्देशाने त्यांनी दि. १८ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री कार्यालय, जलसंपदा विभाग तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे या चारही उपसा सिंचन प्रकल्पांसंदर्भात सविस्तर निवेदन सादर करून सातत्याने पाठपुरावा केला होता. या अथक प्रयत्नांना आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेला अखेर यश आले आहे.
मंजूर झालेल्या योजना आणि त्यांचा लाभ (एका दृष्टीक्षेपात):
सुमारे ७२२.९५ कोटी रुपयांच्या या चारही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील एकूण ४८ गावांतील सुमारे ९,५७३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
”मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची गंभीर दखल घेत तातडीने सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. भविष्यातही गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहतील.”
— डॉ. अशोक नेते (माजी खासदार)
पत्रकार परिषदेला पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, समन्वयक प्रमोदजी पिपरे, नगरपरिषद बांधकाम सभापती तथा शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, गोवर्धन चव्हाण, डॉ. भारत खटी, सुधाकर पेटकर तसेच भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडचिरोलीच्या कृषी क्षेत्रात नवे पर्व सुरू करणारा, सिंचनाचा विस्तार घडवून आणणारा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस चालना देणारा हा ऐतिहासिक निर्णय जिल्ह्याच्या विकासाच्या वाटचालीतील एक ‘मैलचा दगड’ ठरणार असल्याचा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
उपसा सिंचन योजनेचे नाव | तालुका | लाभार्थी गावांची संख्या |
|---|---|---|
रंगायपल्ली उपसा सिंचन योजना | सिरोंचा | १४ गावे |
रमेशगुडम उपसा सिंचन योजना | सिरोंचा | ५ गावे |
शांतीग्राम उपसा सिंचन योजना | मुलचेरा | १५ गावे |
राजीव-चिंचोड उपसा सिंचन योजना | चामोर्शी | १४ गावे |
एकूण | — | ४८ गावे |




