अहेरीमध्ये उबाठा गटाच्या जिल्हाप्रमुख पदाची धुरा निष्ठावंत दिलीप सुरपाम यांच्या खांद्यावर!

0
1
Oplus_16908288

अहेरी :

गडचिरोली जिल्ह्यात पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने फेरबदलांचा सपाटा लावला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी पवन गेडाम यांची मुख्य जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर, आता अहेरी उपविभागात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी खेळली आहे. अहेरी जिल्हाप्रमुख पक्षाचे जुने आणि अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप सुरपाम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

निष्ठावंताला अखेर न्याय! कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

​दिलीप सुरपाम हे गेल्या अनेक वर्षांपासून विपरीत परिस्थितीतही पक्षात सक्रिय असून, त्यांनी अहेरी परिसरात पक्ष वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अनेक चढ-उतार आले तरी पक्ष सोडून न जाता, त्यांनी मातोश्रीशी असलेली आपली निष्ठा कायम ठेवली. त्यांच्या याच निष्ठेची आणि सातत्यपूर्ण कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे अहेरी उपविभागातील जुन्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अहेरी गड राखण्याचे मोठे आव्हान

​अहेरी हा गडचिरोली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. सध्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये या भागात शिवसेना उबाठा गटाला पुन्हा उभे करण्याचे मोठे आव्हान दिलीप सुरपाम यांच्यासमोर असणार आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना पक्षाशी जोडणे, स्थानिक बेरोजगारांचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरून प्रशासनाला धारेवर धरणे या त्रिसूत्रीवर त्यांना काम करावे लागणार आहे.

​पवन गेडाम आणि दिलीप सुरपाम ही नवी जोडी आता गडचिरोली आणि अहेरी भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती यश मिळवून देते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.