अहेरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर उपासमारीची वेळ; विविध मागण्यांसाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन.

0
4

अहेरी:

अहेरी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना मागील पाच महिन्यांपासून कमिशनची रक्कम न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘सरकारी स्वस्त धान्य दुकानदार संघटना, तालुका अहेरी’ च्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली (मार्फत: मा. तहसीलदार, अहेरी) यांना एक लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे दुकानदारांनी आपल्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे.

​कमिशन अभावी दुकानदार संकटात

​स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, अहेरी तालुक्यातील दुकानदारांना मागील पाच महिन्यांचे कमिशन अद्याप मिळालेले नाही. सततच्या या विलंबामुळे दुकानदारांना तीव्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महोदयांनी हे कमिशन तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.

​धान्य विक्रीची मुदत वाढवून देण्याची मागणी

​माहे जून २०२६ चे धान्य अद्यापपर्यंत संबंधित रेशन दुकानांमध्ये पोहोचलेले नाही. धान्य वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे जून २०२६ ची धान्य विक्री मुदत माहे जुलै २०२६ पर्यंत पॉश (POS) मशीनवर ‘कॅरी फॉरवर्ड’ (मुदत वाढवून) करण्यात यावी, जेणेकरून लाभार्थ्यांना धान्याचे योग्य वितरण करता येईल.

​साखरेचे पैसे भरूनही पुरवठा नाही; परताव्याची मागणी

​निवेदनात आणखी एका जुन्या व गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. माहे एप्रिल, मे आणि जून २०२४ मध्ये तालुक्यातील जवळपास ४० दुकानदारांनी चलनाद्वारे साखरेसाठी रीतसर पैसे भरले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही दुकानदारांना अद्याप साखरही मिळाली नाही आणि त्यांनी भरलेले पैसेही परत मिळालेले नाहीत. ही रक्कम दुकानदारांना तातडीने परत करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

​प्रशासनाला विनंती

​या न्याय्य मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन कमिशन देणे, धान्य विक्रीची मुदत वाढवणे आणि साखरेचे चलनाद्वारे भरलेले पैसे परत मिळवून द्यावेत, अशी नम्र विनंती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सु. पट्टीवार, सचिव तिरुपती एन. किर्तीवार, उपाध्यक्ष पवन आर. ताटीकोंडावार , रविंद्र पुंतला पुल्कुर्वार, सचिन विलास नागुलावार, बापु मल्लैया दुर्गे व इतर पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

​प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे आता अहेरी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांचे लक्ष लागले आहे