गोंडवाना विद्यापीठ: प्रशासनासोबतची बैठक ‘निष्फळ’; मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक,

0
3

गडचिरोली:

गोंडवाना विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या न्यायोचित मागण्यांकडे विद्यापीठ प्रशासनाने दाखविलेल्या उदासीनतेमुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनासोबत झालेली चर्चेची फेरी निष्फळ ठरल्यानंतर, आज आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी हाताला काळी फित लावून कामकाज करत प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.बैठकीत तोडगा निघाला नाहीकर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी १३ मार्च २०२६ रोजी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर केले होते. यावर तोडगा काढण्यासाठी २३ मार्च रोजी सायंकाळी प्रशासनासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, “आता केवळ सकारात्मक चर्चेची आश्वासने नकोत, तर मागण्यांवर ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी,” या भूमिकेवर दोन्ही संघटना ठाम राहिल्या. प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न मिळाल्याने ही बैठक अखेर निष्फळ ठरली.कर्मचाऱ्यांचा संताप आणि प्रशासनाची टाळाटाळविद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध सेवाविषयक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ टाळाटाळ केली जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. यामुळेच पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

“गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. आजपासून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू झाला असून, मागण्यांची समाधानकारक पूर्तता न झाल्यास पुढील टप्प्यांतील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

— सतिश पडोळे, सचिव, कर्मचारी संघटना

आजच्या पहिल्या दिवशी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी काळी फित लावून आपल्या कर्तव्यावर हजर राहून प्रशासकीय भूमिकेचा निषेध केला. जर प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर आगामी काळात विद्यापीठाचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .