अहेरी :
भारताचे प्रथम गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त (राष्ट्रीय एकता दिन) आज ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस स्टेशन अहेरीच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ (Run For Unity) मॅरेथॉन स्पर्धेचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासोबतच नागरिकांना सायबर सुरक्षेबाबतही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.
सकाळी ठीक ०७.०० वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत तरुणांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. अहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे ७० ते ७५ उत्साही युवक व युवतींनी या दौडमध्ये मोठ्या सहभागाची नोंद केली. युवकांनी एकतेच्या घोषणा देत संपूर्ण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले.
या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने हर्षवर्धन बी.जे (अप्पर पोलीस अधीक्षक, अहेरी) हेमंत चांदेवार (उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी), हर्षल ऐकरे (पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन अहेरी),पोलीस स्टेशन अहेरीचे अधिकारी व अंमलदार ,सी-६० प्राणहिताचे अधिकारी व अंमलदार ,उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी कार्यालयाचे अधिकारी व अंमलदार या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून सर्व धावपटूंचा व युवकांचा उत्साह वाढवला.
कस्तुरबा बालिका विद्यालय इंदाराम येथे चित्रकला स्पर्धा
राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून केवळ मॅरेथॉनच नव्हे, तर कस्तुरबा बालिका विद्यालय इंदाराम येथे विद्यार्थिनींसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थिनींनी राष्ट्रीय एकता, सलोखा आणि सुरक्षेच्या विषयांवर आपली कला सादर करत उत्स्फूर्त सहभाग घेतला.अहेरी पोलिसांच्या या सामाजिक व प्रबोधनपर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




