अहेरी:24फेब्रुवारी
अहेरी तालुक्यातील प्राणहिता कॅम्प ते अहेरी या मुख्य रस्त्याची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे. केवळ २ ते २.५ किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून ‘थंड बस्त्यात’ असल्याने सामान्य नागरिकांसह वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापुरतीच ‘मलमपट्टी’?काही महिन्यांपूर्वी अहेरी येथे महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. त्यावेळी प्रशासनाने घाईघाईत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये गिट्टी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली होती. मात्र, दर्जाहीन कामामुळे अल्पावधीतच ही गिट्टी उखडून पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत.वाहनधारकांची ‘तारेवरची कसरत’
आरोग्यावर परिणाम: खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत आहेत.
रुग्णांचे हाल: दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना आणि गरोदर महिलांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून यावे लागते.
विद्यार्थ्यांची गैरसोय: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत असून सायकल चालवणेही कठीण झाले आहे.
अपघातांचे प्रमाण: खड्डे चुकवण्याच्या नादात दररोज छोटे-मोठे अपघात होत असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
“केवळ दोन-अडीच किलोमीटरच्या कामासाठी प्रशासन कोणता मुहूर्त शोधत आहे? रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महिला भगिनींना दुचाकी चालवणे अशक्य झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ डांबरीकरणाचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— अशोक आइंचवार (सामाजिक कार्यकर्ते, अहेरी)
प्रशासनाला इशारा:या रस्त्यावर होत असलेली वर्दळ पाहता, भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरत आहे.





