अहेरी: 15ऑक्टोबर.
सज्जनशक्तीच्या विजयाचे प्रतीक असलेला आणि राष्ट्र सेविका समितीचा स्थापना दिवस असलेला ‘विजयादशमी’ उत्सव समितीच्या आलापल्ली शाखेने ११ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला. ‘श्रीराम मंदिर’ ते ‘वीर बाबुराव चौक’ मार्गे ‘ग्रामपंचायत’ असा भव्य संचलन सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन स्त्रीशक्तीचे विराट दर्शन घडवले.
भव्य संचलनाने वेधले लक्ष
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विजयादशमीनिमित्त भव्य पथसंचलन काढण्यात आले. शिस्तबद्धरीत्या, घोषणा देत निघालेल्या या संचलनाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. संचलन परत श्रीराम मंदिरात पोहोचल्यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. याठिकाणी सेविकांनी विविध प्रात्यक्षिके, देशभक्तीपर गीत आणि समूहगीत सादर केले.
स्वदेशीचा संदेश आणि समितीचे कार्य
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती राधिका गुप्ता (सेवानिवृत्त शिक्षिका, आलापल्ली) तसेच प्रमुख वक्ता म्हणून सौ. अश्विनी दाणी (चंद्रपूर विभाग, अभिलेख प्रमुख) उपस्थित होत्या.
श्रीमती राधिका गुप्ता यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना ‘स्वदेशी’ वस्तू वापरण्याचे फायदे आणि विदेशी वस्तूंच्या वापरामुळे देशाचे होणारे नुकसान अतिशय सोप्या उदाहरणांसह समजावून सांगितले. त्यांनी महिलांना स्वदेशी उत्पादनांची यादी वाचून दाखवत राष्ट्रकार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
सौ. अश्विनी दाणी यांनी प्रमुख वक्ता म्हणून ‘संघ विचार हाच राष्ट्र विचार आहे’ यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ‘पंचपरिवर्तन’ या संकल्पनेवर भर देत राष्ट्र सेविका समितीच्या गेल्या ९० वर्षांच्या कार्याचा विस्तृत आढावा सेविकांना दिला.
यावेळी मंचावर चंद्रपूर विभाग सहकार्यवाह सौ. अंजली हिरूरकर, तसेच नगर कार्यवाह (आलापल्ली) सौ. प्राजक्ता चव्हाण यांचीही सन्माननीय उपस्थिती होती.
राष्ट्र सेविका समितीचा स्थापना दिवस, रामाने रावणावर मिळवलेला विजय, तसेच महिषासुरमर्दिनीने महिषासुराचा केलेला वध या विजयपर्वाचे स्मरण करून, ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.




