आल्लापल्ली: ११ सप्टेंबर रोजी, आल्लापल्ली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात वन शहीद दिन (Forest Martyr’s Day) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश वन्यजीव आणि वन संरक्षणाचे काम करताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाला आदराने गौरवणे हा होता. यावेळी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमात, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व आणि त्यात येणाऱ्या आव्हानांविषयी चर्चा केली. वन्यजीव तस्करी, वन जमिनीवर होणारे अतिक्रमण, आणि नैसर्गिक संकटे यांसारख्या धोक्यांचा सामना करताना वन कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. अशा परिस्थितीत ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे स्मरण करणे हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते.
या कार्यक्रमाला आल्लापल्लीवन विभागाचे उप वनसंरक्षक दीपाली तलमले, भामरागड उप वनसंरक्षक शैलेश मीना
आणि सिरोंचा वन विभागाचे उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्यासह परिविक्षाधीन भारतीय वन सेवा अधिकारी मोहम्मद आझाद आणि विष्णू रेड्डी, तसेच ACF पवार, रामटेके, बाळापुरे, आणि वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश चौके, गौरव गणवीर,नारायण इंगळे, गडमाडे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ आणि वन्यजीव प्रेमींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यामुळे वन संरक्षणाचे महत्त्व आणि शहीद वन कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढली. त्यांनी एकत्रितपणे वनक्षेत्रातील शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्राण गमावलेल्या शूर शहीदांना आदराने नमन केले.




