मिलिंद खोंड:24 ऑक्टोबर.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ह्या विधानसभा क्षेत्रावर काही अपवाद वगळता राजघराण्याचे वर्चस्व राहिले आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून राजनगरी अहेरी राहिली आहे.यावेळी विधानसभा निवडणुकीत वडील आणि मुलगी आमने-सामने उभे ठाकणार आहे.त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष या अहेरी विधानसभेकडे लागले आहे. अहेरी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा तर्फे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना उमेदवारी घोषित झाली होती.आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा तर्फे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना विधानसभेसाठी उमेदवारी घोषित झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात वडील विरुद्ध मुलीमध्ये लढाई रंगणार आहे.
भाऊ-भाऊ, काका-पुतण्या, मुलगा-वडील, भाऊ-बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी नवा नाही. याआधी अशा अनेक राजकीय लढाया झाल्या आहेत. ही राजकीय लढाई असेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामधली. कारण, धर्मरावबाबांच्या कन्येनं बंड केलं असून ,सप्टेंबर महिन्यात अहेरीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,माजी गृहमंत्री अनिल देशमुख व ईतर नेत्यांच्या उपस्थिती मध्ये तुतारी हाती घेतली होती.त्यामुळे येत्या काळात इथे बाप-लेक-पुतण्या असा त्रिकोणी राजकीय संघर्ष बघायला मिळणार आहे. त्यासोबतच काँग्रेसच्या दाव्याने चौरंगी लढतीची शक्यता आहे.महायुती तर्फे कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी घोषीत झाल्या मुळे माजी पालकमंत्री अंबरीश राव आत्राम यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता मावळली असली तरी,त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळवीण्याचे शेवटचे पर्याय चाचपून बघितले होते तरीही ,त्यांचा पदरी निराशाच हाती आली आहे .त्यामुळे अपक्ष लढण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे अहेरी विधानसभेत महायुतीत राजे बंडखोरीचा झेंडा उभा करणार.
तिकडे महाविकास आघाडीकडून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष बघायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या ठिकाणी मैत्री पूर्ण लढतीची घोषणा करून काँग्रेस कार्यकर्त्यांना बूस्ट दिले होते .काँग्रेस हनमंतू मडावी यांच्यासाठी आग्रही आहेत. काँगेसच्या २०१९ मध्ये देखील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत या विधानसभा क्षेत्रात झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले होते .काँग्रेस च्या दाव्याने अहेरी विधानसभेत चौरंगी लढत दिसण्याची शक्यता आहे.त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीत वाद पेटण्याची दाट चिन्हे आहेत.




