मोठी बातमी:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांत चकमक. पाच नक्षलवाद्यांचा खात्मा.

0
1430

गडचिरोली:

महाराष्ट्र -छत्तीसगड सीमेवरील कोठी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या कोपर्शी च्या जंगलात नक्षलविरोधी अभियान राबविताना सोमवारी दुपारी नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांत चकमक उडाल्याची माहिती प्राप्त होत आहे.या चकमकीत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त होत आहे.या चकमकीत एक सुरक्षा जवान जखमी झाल्याची माहिती आहे.विशेष ,म्हणजे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असून चकमकी च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कोपर्शी
च्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर यंत्रणा द्वारे प्राप्त झाली होती.त्यानुसार नक्षलवादी अभियान पथकाने मोठया प्रमाणात शोध मोहीम राबवून कारवाई केली .
या चकमकीत नक्षलवाद्यांनी  सुरक्षा जवानांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला प्रत्युत्तरात सुरक्षा जवानांनी  त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटायची आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचा इरादा असतो सुरक्षा जवानांनी हाणून पाडला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांना पोलिसांच्या मोठा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री आत्राम हे भामरागड तालुक्याला सकाळी गेले. अशातच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.