प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात गावकऱ्यांचा एल्गार; खांदला-चिरेपल्ली रस्त्याची श्रमदान व लोकवर्गणीतून तात्पुरती दुरुस्ती.

0
1

अहेरी:

खांदला ते चिरेपल्ली आणि पुढे आलापल्ली जोडणाऱ्या २२ किलोमीटरच्या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. एक महिना आंदोलन करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद किंवा कार्यवाहीचा अहवाल न मिळाल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसा गोळा करत आणि श्रमदान करत बुधवारी (दि. १८) सकाळी रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरू केली.

अनेक वर्षांपासून रस्ता दुरवस्थेत; नागरिकांचे हाल

या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने शालेय विद्यार्थी, गरोदर माता आणि रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी सुस्थितीतील रस्ता गरजेचा आहे. मात्र, वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

लोकवर्गणी आणि श्रमदानातून खड्डे बुजवले

प्रशासनाच्या आश्वासनांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतःच पुढाकार घेतला. चिरेपल्ली, पत्तीगाव, कोत्तागूडम आणि मरनेली येथील शेकडो महिला, पुरुष आणि तरुणांनी आज सकाळपासून श्रमदान केले. गावकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून मुरूम आणि गिट्टी आणून ट्रॅक्टर व हाताच्या साहाय्याने खड्डे बुजवले, त्यामुळे रस्ता तात्पुरता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

कायमस्वरूपी रस्त्यासाठी उपोषणाचा इशारा

“तात्पुरती दुरुस्ती केली असली तरी आगामी पावसाळ्यात हा रस्ता पुन्हा वाहून जाण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने कायमस्वरूपी रस्ता मंजूर करून बनवावा; अन्यथा लवकरच गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व गावकरी आमरण उपोषण करतील,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किरणकुमार मोकाशी यांनी दिला.

या श्रमदान मोहिमेत पत्तीगाव, चिरेपल्ली, मरनेली आणि कोत्तागूडम येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.