अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत द्या: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अहेरी जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांची राज्य सरकारकडे मागणी

0
2
Oplus_16908288

अहेरी :

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा या पाचही तालुक्यांमध्ये यंदा पावसाची अनियमितता तसेच पिकांवर कीड व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत या सर्व तालुक्यांना तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अहेरीचे जिल्हाप्रमुख दिलीप सुरपाम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीची पाहणी

विधानसभा क्षेत्रातील पाचही तालुक्यांचा प्रत्यक्ष दौरा केला असता, अनेक गावांमधील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे निदर्शनास आले आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्यामुळे पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम झाला असून, भात व इतर पिकांवर कीड व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हाताोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर आता संसाराचा गाडा कसा चालवायचा, शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि पुढील हंगामाची तयारी कशी करायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता थेट प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानाचे पंचनामे करावेत.

राज्य सरकारने या भागातील परिस्थिती गांभीर्याने घेत पाचही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत तातडीने मंजूर करावी. तसेच पीकविमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत विनाविलंब पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा मिळाला नाही, तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा सज्जड इशारा जिल्हाप्रमुख

सुरपाम यांनी राज्य सरकारला दिला आहे.