अहेरी:-
पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलिस अधीक्षक कार्तिक मधिरा यांच्या मार्गदर्शनात काल अहेरी पोलिस स्टेशन येथे माओवाद मुक्त दिवाळी साजरी करण्यात आली.यावेळी अहेरी चे उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत चांदेवार,पोलिस निरीक्षक हर्षल एकरे,पोलिस उपनिरीक्षक पवार,गुंजाळ,महिला पोलिस उपनिरिक्षक भगवंती चौधरी,पोलिस कर्मचारी उपस्थित होते.माओवाद मुक्त दिवाळी या उपक्रमात अहेरी परिसरातील वृद्ध निराधार,गरजू परिवारांना तसेच समर्पित नक्षल परिवारांना २५ किलो तांदूळ,तेल,किराणा साहित्य,दिवाळी फराळ,मिठाई,लहान मुलांना फटाके, आदि वाटण्यात आले.विशेष म्हणजे सामाजिक एकोप्याचे उदाहरण देत अहेरीचे दोन मुस्लिम युवक नेहाल शेख,वसीम शेख यांनी दिवाळी निमित्त गरजूंना अधिकचे तांदूळ कट्टा वाटप केले. अहेरी पोलिस स्टेशन च्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मिळून सर्व गरजू महिलांना साडी व लुगडे यांचे वाटप केले.उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत चांदेवार तथा पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी माओवाद मुक्त दिवाळी चे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला पोलिस उपनिरीक्षक भगवंती चौधरी यांनी केले. दिवाळी च्या दिवशी निराधार व गरजू परिवाराच्या चेहऱ्यावर आनंद आणता आला याचे समाधान आहे असे पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांनी म्हटले.




