अहेरी:
वन्यजीव सप्ताहाच्या औचित्याने आल्लापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या अहेरी वनपरिक्षेत्राच्या वतीने अहेरी शहरात भव्य वन्यजीव जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव आणि जंगलाचे रक्षण व संवर्धन व्हावे, या मुख्य उद्देशाने ही रॅली काढण्यात आली.
रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी आल्लापल्लीचे उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहाय्यक उपवनसंरक्षक शिशुपाल पवार, अहेरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी इंगळे तसेच सीआरपीएफ (CRPF) चे वरिष्ठ अधिकारी व जवान प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा रीतसर प्रारंभ करण्यात आला.
ही जनजागृती रॅली वनपरिक्षेत्र कार्यालयातून निघून कोर्ट परिसर, दानशूर चौक, आझाद चौक, छोटा बस स्टँड आणि एस. बी. कॉलेज मार्गे मॉडेल स्कूल येथे पोहोचून समाप्त झाली.
या रॅलीमध्ये मॉडेल स्कूलचे विद्यार्थी हातात जनजागृतीपर संदेश असलेले फलक घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच वन कर्मचारी, सीआरपीएफचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वन्यजीव संवर्धनाचा नारा दिला. रॅलीच्या माध्यमातून संपूर्ण अहेरी शहरात पर्यावरण व वन्यजीव रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.




