गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई,माओवाद्यांनी पुरून ठेवलेली ६ अग्निशस्त्रे आणि स्फोटक साहित्य जप्त

0
3

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी कारवाया आता शेवटच्या घटका मोजत असून माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. दरम्यान, सुरक्षा दलांना धोका पोहोचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी जंगलात जमिनीत पुरून ठेवलेला शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडलेल्या या विशेष अभियानात पोलिसांनी ६ अग्निशस्त्रांसह मोठा स्फोटक साठा जप्त केला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रे आणि स्फोटक साहित्य जमिनीत लपवून ठेवल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० (विशेष अभियान पथक, प्राणहिता) च्या ५ तुकड्या आणि बीडीडीएस  च्या २ पथकांनी ६ ऑक्टोबर रोजी या भागात शोध मोहीम राबवली.

विशेष अभियान पथकाने संपूर्ण जंगल परिसराला वेढा देऊन तपासणी केली असता, जमिनीत लपवलेले खालील साहित्य हस्तगत करण्यात आले:

  • अग्निशस्त्रे व दारूगोळा: १ .३०३ रायफल, २ सिंगल शॉट रायफल, २ गावठी पिस्टल, १ बीजीएल (BGL) लॉन्चर, १० बीजीएल सेल, २१ जिवंत काडतुसे आणि २ मॅगझिन (एकूण ६ अग्निशस्त्रे).

  • स्फोटक व इतर साहित्य: ७ डेटोनेटर, १५० मीटर केबल वायर, २ कुकर, ३ वॉकीटॉकी, ३ वॉकीटॉकी चार्जर आणि २ वॉकीटॉकी बॅटरी.

याशिवाय घटनास्थळी सापडलेले इतर संवेदनशील माओवादी साहित्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तेथेच नष्ट करण्यात आले.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बि. जे., आणि पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. सुनील उईके यांच्या देखरेखीखाली सी-६०, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकाच्या जवानांनी पार पाडली. पोलीस अधीक्षकांनी या धडक कारवाईत सहभागी असलेल्या सर्व जवानांचे कौतुक केले आहे.