अतिवृष्टीमुळे रस्ते बंद, तरीही पोलीस बनले देवदूत: भामरागडच्या दुर्गम लाहेरीतील तरुणाचे हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करून वाचवले प्राण

0
1

गडचिरोली:

मागील काही दिवसांपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत गडचिरोली पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एका तरुणाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळून त्याचे प्राण वाचले आहेत.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आज दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी भामरागड उपविभागातील अतिदुर्गम मौजा लाहेरी येथील रहिवासी श्री. शामसुंदर नरोटी (वय ३५ वर्ष) यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंशामुळे अचानक अत्यंत गंभीर झाली. गावातून बाहेर पडण्याचे सर्व रस्ते पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी नेणे अशक्य झाले होते. ही माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने कसलाही विलंब न लावता तातडीने हालचाली सुरू केल्या.तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्री. नरोटी यांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवणे गरजेचे असल्याने, गडचिरोली पोलिसांच्या ‘पवन हंस’ हेलिकॉप्टरला भामरागडसाठी रवाना करण्यात आले. वैमानिक श्री. अरविंद सैनी व श्री. राजीव शर्मा यांनी प्रतिकूल परिस्थितीत हेलिकॉप्टर भामरागड येथे उतरवून रुग्णाला सुरक्षितपणे गडचिरोलीला आणले.श्री. शामसुंदर नरोटी यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर आहे.

अंधश्रद्धेला बळी पडू नका – पोलीस अधीक्षकांचे आवाहन

या घटनेनंतर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी भामरागड व परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपत्कालीन किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत कोणत्याही अंधश्रद्धेला किंवा भोंदूबाबांच्या सांगण्याला बळी पडू नका. आजाराच्या वेळी तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा पोलीस व प्रशासनाच्या आपत्कालीन सेवांशी संपर्क साधून वेळेवर वैद्यकीय उपचार घ्यावेत.”ही संपूर्ण बचाव मोहीम गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोलीस स्टेशन भामरागडचे अधिकारी व कर्मचारी, महसूल विभाग आणि पवन हंसच्या वैमानिकांच्या उत्तम समन्वयाने यशस्वीपणे पार पडली. प्रशासनाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.