चालत्या बसचा मागील भाग निखळला; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, प्रवाशांमध्ये घबराट

0
1
Oplus_16908288

भंगार बसेस आणि रस्त्यांची दुरवस्था; अहेरी आगाराच्या कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

अहेरी /एटापल्ली:

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अहेरी आगाराच्या भंगार बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास आता कमालीचा भीतीदायक आणि जीवघेणा ठरत आहे. सोमवार, ६ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अहेरी आगाराच्या एका चालत्या एसटी बसचा मागील संपूर्ण पत्रा (बॉडी) अचानक निखळून रस्त्यावर कोसळल्याची खळबळजनक घटना एटापल्ली शहरात घडली. सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार ६ जुलै रोजी सायंकाळी गडचिरोली-घोट-एटापल्ली-अहेरी मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची अहेरी आगाराची बस (क्रमांक MH07 C 9483) धावत होती. ही बस मुलचेरा, बोलेपल्ली मार्गे अहेरीकडे निघाली होती. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एटापल्ली येथील गोटूलसमोरील मुख्य रस्त्यावर आली असता, अत्यंत दुरवस्थेच्या रस्त्यामुळे जोरात धक्का बसून बसचा मागील संपूर्ण भाग (पत्रा) चालत्या अवस्थेतच तुटून रस्त्यावर कोसळला.

३० प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला!

घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे ३० प्रवासी प्रवास करत होते. अचानक मोठा आवाज होऊन बसचा पत्रा निखळल्याने बसमधील प्रवाशांची एकच घाबरगुंडी उडाली आणि त्यांचा काळजाचा ठोका चुकला. चालकाने प्रसंगावधान राखून त्वरित बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

चक्क ‘टेप’ लावून चालवला जातोय कारभार!

निखळलेल्या पत्र्याची पाहणी केली असता, एसटी महामंडळाचा धक्कादायक आणि निष्काळजीपणा समोर आला आहे. तो पत्रा पूर्णपणे जीर्ण झाला असून चक्क ‘टेप’च्या साहाय्याने चिकटवल्याचे निदर्शनास आले. दीड वर्षापूर्वी याच अहेरी आगाराच्या धावत्या बसचे छत हवेत उडाल्याची घटना ताजी असताना, आता पुन्हा चक्क टेपने चिकटवलेला पत्रा निखळल्याची बाब समोर आल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रस्त्यांची दैन्यावस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

अहेरी उपविभागातील घोट-एटापल्ली-अहेरी मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दुरवस्थेत पोहचली आहे. खड्ड्यांचे साम्राज्य आणि त्यात भर म्हणून अहेरी आगाराच्या या भंगार बसेस, यामुळे प्रवाशांना दररोज आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर प्रकारानंतर तरी एसटी महामंडळ आणि संबंधित प्रशासन झोपेतून जागे होऊन रस्त्यांची दुरुस्ती करणार की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.