गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील बालकलावंतांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर थेट देशाच्या राजधानीतील राष्ट्रीय रंगमंच गाठत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD), इंडियन ऑईल आणि आदिग्राम (आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रंग पल्लव महोत्सव २०२६’ अंतर्गत २१ जून रोजी नवी दिल्ली येथील NSD च्या राष्ट्रीय अभिमंच सभागृहात ‘हाताऊ आबा-आबा’ या बालनाट्याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.या प्रतिष्ठित राष्ट्रीय महोत्सवात महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांतील बालनाट्य संघांनी सहभाग नोंदविला होता. अशा मानाच्या व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातील अहेरी तालुक्याला मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली.‘हाताऊ आबा-आबा’ म्हणजे निसर्गाची सर्वोच्च शक्ती. या संकल्पनेवर आधारित नाटक जंगल, निसर्ग आणि पर्यावरणाशी एकरूप होऊन जगणाऱ्या मूलनिवासी आदिवासी समाजाचे जीवनदर्शन घडवते. आदिवासी संस्कृती, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि आधुनिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांच्या अस्तित्वासाठी सुरू असलेला संघर्ष या नाटकातून अत्यंत संवेदनशील आणि प्रभावीपणे मांडण्यात आला.या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रख्यात रंगकर्मी अखिलेश खन्ना यांनी केले असून, सहदिग्दर्शिका म्हणून खुशबू कुमारी (NSD, नवी दिल्ली) यांनी योगदान दिले. नाटकाचे संगीत संयोजन युवा रंगकर्मी राहुल पेंढारकर यांनी केले आहे. सुहास नगराळे यांनी नाट्य शिबिराला विशेष सहकार्य केले आहे.
‘आदिग्राम’चे उल्लेखनीय योगदान :
आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण आणि अतिदुर्गम भागांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या पुढाकारातून इंडियन ऑईल आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासारख्या राष्ट्रीय संस्थांशी समन्वय साधून आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर कलावंत म्हणून घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.याबाबत माहिती देताना राहुल पेंढारकर म्हणाले की,”आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. भविष्यातही अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यात येणार आहे.” जंगलाच्या कुशीतून उडालेल्या या ‘रानपाखरांनी’ दिल्लीच्या राष्ट्रीय रंगमंचावर आपल्या कलेची मोहोर उमटवत गडचिरोलीसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. ह्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
…आणि तयार झाले ‘हाताऊ आबा-आबा’!
«”गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून रात्रीच्या प्रवासात जात असताना, तुटके रस्ते, जंगलातील भयावह शांतता आणि तेथील आदिवासी जीवन माझ्या मनात खोलवर रुजत गेले. अहेरीतील आदिवासी मुलांना भेटल्यानंतर त्या अनुभवांना नाट्यरूप मिळाले. कार्यशाळेदरम्यान मुलांसोबत केलेल्या उत्स्फूर्त प्रयोगांतून जंगल, वन्यजीव, आदिवासी संस्कृती आणि निसर्गाच्या सर्वोच्च शक्तीची संकल्पना आकाराला आली. राहुल पेंढारकर यांच्या संकल्पना व सहकार्यामुळेच ‘हाताऊ आबा-आबा’ या नाटकाचा जन्म झाला. आज हेच नाटक दिल्लीच्या राष्ट्रीय रंगमंचावर पोहोचल्याचे समाधान शब्दांत व्यक्त करता येणार नाही.”»
— खुशबू कुमारी, सहदिग्दर्शिका, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली

उंच उडा रे रान पाखरांनो…!
«”अहेरीच्या जंगलात रुजलेले स्वप्न दिल्लीच्या राष्ट्रीय रंगमंचावर फुलले; ‘हाताऊ आबा-आबा’ हा केवळ नाट्यप्रयोग नसून आदिवासी अस्मिता, निसर्ग आणि संघर्षाची जिवंत कहाणी आहे.”» NSD ने येथील बालकलावंतांना प्रशिक्षण देऊन नाटकाचा पाया निर्माण केला आहे पण आता संपूर्ण इमारत उभं करण्याची जबाबदारी येथील स्थानिक नाट्य संस्थांची आहे. हा नाट्य प्रवास आता इथेच थांबायला नको. ह्या रानपाखरांना उंच उडण भरण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. आदिवासी ग्रामीण साहित्य बहुउद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ सारख्या चांगल्या संस्था पुढे येवून हा नाट्यप्रवास अविरत सुरू ठेवावा.
— अखिलेश खन्ना, दिग्दर्शक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली
आदिवासी संस्थांची उपेक्षा: स्थानिक कंपन्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी.!
इंडियन ऑइलचे मुख्यालय बाहेर असूनही ते गडचिरोलीतील अहेरी सारख्या भागात निधी देतात. मग आपल्याच जिल्ह्यातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवणारी ‘सूरजागड लॉईड मेटल कंपनी’ स्थानिक आदिवासी नाट्य संस्थांना निधी का देत नाही? हा खरा प्रश्न आहे.आज अतिदुर्गम भागात इंडियन ऑइल आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्यामुळे आमच्या गडचिरोलीतील तरुणांना कलेचे उत्तम व्यासपीठ मिळाले, हे कौतुकास्पद आहे.सूरजागड प्रकल्पाकडून गडचिरोलीतील स्थानिक नाट्य आदिवासी संस्थांना येथील मुलांमध्ये सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी सीएसआर निधी मिळावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कंपनीकडे कायदेशीर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
राहुल पेंढारकर, युवा रंगकर्मी, झाडीपट्टी रंगभूमी.




