अहेरी:
अहेरी नगरपंचायतीचे कर अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या तीन मुख्य आरोपींना आज (सोमवार) अहेरी पोलिसांनी चामोर्शी न्यायालयात सादर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत (MCR) रवानगी केली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या जामीन अर्जावर आता येत्या बुधवारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याने या हाय-प्रोफाइल केसकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे.
शरण आलेल्या आरोपींची ‘MCR’ मध्ये रवानगी
घटनेनंतर सातत्याने फरार असलेल्या ज्या तीन मुख्य आरोपींनी पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे अखेर शरणागती पत्करली होती, त्या तिघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये:१. अजय दादाराव नैताम२. श्रीनिवास उर्फ पिंटू लक्ष्मण मडावी३. इमरान मुस्तफा पठाणयांचा समावेश आहे. या प्राणघाती हल्ल्याचा मुख्य हेतू, कट आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांकडून आरोपींची पोलीस कोठडी (PCR) मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती; मात्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली आहे. यापूर्वी मुख्य संशयित अजय कंकडालवार यांनाही १३ जून रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
काय आहे नेमकं प्रकरण?
अहेरी नगरपंचायतीचे कर व प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे यांच्यावर मॉर्निंग वॉक दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अहेरी नगरपंचायतींतर्गत करण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा राग मनात धरून पूर्ववैमनस्यातून हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप आहे. या गंभीर गुन्ह्याची नोंद होताच अहेरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मुख्य संशयित अजय कंकडालवार यांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांच्या वाढत्या धास्तीमुळे इतर तीन मुख्य आरोपींनाही आत्मसमर्पण करावे लागले.
बुधवारी होणार जामीन अर्जावर सुनावणी!
या संपूर्ण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. या जामीन अर्जावर आता येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायालय कंकडालवार यांना जामीन मंजूर करते की त्यांचा मुक्काम जेलमध्येच राहतो, तसेच या प्रकरणात पुढे काय कायदेशीर घडामोडी घडतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.




