अहेरी (गडचिरोली):
जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात एक भव्य रक्तदान शिबिर पार पडले. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलाने या शिबिराच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी जपत मानवतेचे एक प्रेरणादायी दर्शन घडविले आहे. या शिबिरात तब्बल २२८ जणांनी उत्स्फूर्तपणे आणि स्वेच्छेने रक्तदान केले.
परंपरेला अधिकारी अन् जवानांचा उदंड प्रतिसाद
नक्षलविरोधी मोहिमांचे मुख्य केंद्र असलेल्या प्राणहिता उपमुख्यालयात दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची गौरवशाली परंपरा आहे. रविवार, १४ जून रोजी अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे. यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या मोहिमेत पोलीस अधिकारी, जवान आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाचा हक्क बजावला. नागपूर येथील प्रसिद्ध ‘शालिनीताई मेघे रक्तपेढी’च्या वैद्यकीय पथकाने या संपूर्ण शिबिरात रक्तसंकलनाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेराचे ठाणेदार महेश विधाते, आष्टीचे ठाणेदार विशाल काळे, अहेरीचे ठाणेदार हर्षल एकरे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व जवानांनी विशेष परिश्रम घेतले.
खाकी वर्दीतील देवदूत: वृद्ध महिला रुग्णाला दिले नवजीवन
या शिबिरादरम्यान खाकी वर्दीतील संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला. विमला बाबुराव बामनकर या वृद्ध महिला रुग्णाला ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची अत्यंत तातडीची गरज निर्माण झाली होती. त्यांची कन्या वर्षा सोनटक्के यांनी ही अडचण प्रशासनासमोर मांडली.उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी तात्काळ आवाहन करताच, सीआरपीएफ (CRPF) ग्रुप क्र. १७ चे जवान निलेश सातपुते आणि राजाराम यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी रक्ताची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले होते, तरीही या जवानांनी सोमवारी रक्तदान करत आपला शब्द आणि कर्तव्य पूर्ण केले.
मानवतेचा नवा आदर्श
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात कर्तव्यावर असतानाही पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशील कृतीमुळे या शिबिराने केवळ रक्तसंकलनाचा आकडाच गाठला नाही, तर समाजासमोर मानवतेचा आणि खाकी वर्दीच्या कर्तव्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.




