कौटुंबिक कलहातून पोटच्या मुलानेच बापाची केली हत्या; आरोपीस अटक

0
1

अहेरी (गडचिरोली):

दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ भांडणातून पोटच्या मुलानेच आपल्या वयोवृद्ध वडिलांची लाकडी बल्लीने डोक्यावर व चेहऱ्यावर जबर प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळजनक वातावरण निर्माण झाले असून, अहेरी पोलिसांनी आरोपी मुलावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

**किरकोळ वादाचे पर्यावसान हत्येत**

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नारायण आशा टेकाम (वय ६१ वर्षे, व्यवसाय- मजुरी, रा. लगाम चेक) असे मृतकाचे नाव आहे. ४ जून २०२६ च्या रात्री १०:०० ते ११:५० वाजताच्या सुमारास मृतक नारायण यांचा मोठा मुलगा आरोपी विजय नारायण टेकाम (वय ४० वर्षे) हा दारूच्या नशेत घरी आला. दारूच्या नशेत त्याने वडिलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी विजयने रागाच्या भरात घरात असलेल्या लाकडी बल्लीने (दांड्याने) वडिलांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जबर मारहाण केली. या भीषण हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने नारायण टेकाम यांचा जागीच मृत्यू झाला.

**अहेरी पोलिसांत गुन्हा दाखल**

या संदर्भात मृतकाचे भाऊ तुळशीराम आशा टेकाम (वय ६५ वर्षे, रा. लगाम चेक, ता. मुलचेरा) यांनी ५ जून रोजी अहेरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून अहेरी पोलिसांनी आरोपी विजय नारायण टेकाम याच्याविरुद्ध अप. क्र. ०१६६/२०२६, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

**पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू**

घटनास्थळ अहेरी पोलीस ठाण्यापासून २५ किमी अंतरावर पश्चिम दिशेला असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. अहेरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक **हर्षल ऐकरे** यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे.