अहेरी उपविभागीय सुशिक्षित बेरोजगार अभियंता समन्वय संघटनेची कार्यकारिणी गठीत. ३३ टक्के कोट्याच्या अंमलबजावणीसाठी निवेदन

0
5

अहेरी:

अहेरी उपविभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या (सु.बे) समस्या सोडवण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी सु. बे. कंत्राटदार संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. दिनांक ११ मार्च २०२६ रोजी PWD रेस्ट हाऊस, आलापल्ली येथे झालेल्या बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी एकमताने गठित करण्यात आली.

या बैठकीत अमित राजू येनप्रेड्डीवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच महेश लक्ष्मण येर्रावार व वैभव दिलीप देशमुख यांची उपाध्यक्ष, संदीप मलरेड्डी येमनुरवार यांची सचिव व शुभम प्रशांत कुत्तरमारे यांची सहसचिव म्हणून तर पुनेश राजेश्वर कंदीकुरवार यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय सागर घनश्याम डेकाटे, लक्ष्मण भाऊराव मेश्राम,अन्वेष लच्चया गद्देवार, दानिश अशफाक शेख, रितीक विवेक चेलियालवार व मुकेश रत्नावार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

दरम्यान, १२ मार्च 2026 रोजी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आलापल्लीचे कार्यकारी अभियंता (E.E.) यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शासन निर्णयानुसार सु.बे कंत्राटदारांसाठी राखीव असलेल्या ३३ टक्के कामांच्या कोट्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,शासनाने स्थानिक सुशिक्षित अभियंत्यांना कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ३३ टक्के कोट्याची तरतूद केली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून स्थानिक अभियंत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.