अहेरी :23 फेब्रुवारी
सकल हिंदू समाजाच्या वतीने आलापल्ली येथे येत्या बुधवारी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘भव्य हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हिंदू समाजाचे संघटन आणि जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यासाठी आलापल्ली आणि नागेपल्ली परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले असून, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.२४ फेब्रुवारी: भव्य बाईक रॅलीने होणार सुरुवात
संमेलनाची पूर्वतयारी आणि वातावरण निर्मितीसाठी मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली नागेपल्ली येथील हनुमान मंदिरापासून सुरू होऊन आलापल्ली येथील श्रीराम मंदिरापर्यंत काढण्यात येईल. यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
२५ फेब्रुवारी: कलश यात्रा आणि मुख्य संमेलन
बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता शहरातील विविध प्रभागांतून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे.
प्रस्थान मार्ग: गोंड मोहल्ला, एटापल्ली रोड, वेलगुर रोड, भामरागड रोड, सावरकर चौक, बिरसामुंडा वॉर्ड आणि नागेपल्ली अशा विविध भागांतील मंदिरांपासून भाविक श्रीराम मंदिराकडे प्रस्थान करतील.
महाआरती व शोभायात्रा: सकाळी १०:३० वाजता श्रीराम मंदिर येथे संतांचे स्वागत आणि महाआरती होईल. त्यानंतर ११:०० वाजता वाजत-गाजत ही शोभायात्रा क्रीडा संकुल, आलापल्ली येथे पोहोचेल.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
बुधवारी सकाळी ११:३० वाजता क्रीडा संकुल येथे मुख्य संमेलनाला सुरुवात होईल. या संमेलनासाठी मुनी श्री पंकज जी महाराज हिंदुस्तानी फक्कड (दिव्य शक्ती पीठ, मध्य प्रदेश) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत शारीरिक प्रमुख श्री. प्रशांतजी दाणी हे मुख्य वक्ते म्हणून मार्गदर्शन करतील.महाप्रसादाचे आयोजन
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.आयोजकांचे आवाहन:”संघटित समाज, सशक्त भारत” हा मंत्र घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात आलापल्ली व नागेपल्लीतील समस्त जनतेने, विशेषतः माता-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, आलापल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे.




