गडचिरोली पोलीस दलाचा माणुसकीचा हात; अतिदुर्गम बिनागुंडा येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न २५० हून अधिक नागरिकांची मोफत तपासणी; तज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार व मार्गदर्शन

0
2

गडचिरोली:15 फेब्रुवारी

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून, नवनिर्मित पोलीस मदत केंद्र (पोमके) बिनागुंडा येथे आज, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ बिनागुंडा, कुवाकोडी, फोदेवाडा व परिसरातील अतिदुर्गम गावांतील २५० हून अधिक नागरिक आणि विद्यार्थ्यांनी घेतला.

तज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे रुग्ण तपासणी

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ (९ बटा.) यांच्या तज्ञ वैद्यकीय पथकाने सहभाग नोंदवला. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. माधुरी किलनाके (सर्जन), डॉ. प्रशांत पेंदाम (बालरोग तज्ञ), पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ. गणेश चिचघरे आणि सीआरपीएफचे डॉ. डी. एस. मोहन यांनी रुग्णांची कसून तपासणी केली.

विद्यार्थी व मातांवर विशेष लक्ष

या शिबिरात केवळ तपासणीच नाही, तर आजारांनुसार रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. बालरोग तज्ञांनी शालेय विद्यार्थ्यांची तपासणी केली, तर स्त्रीरोग तज्ञांनी गरोदर माता व इतर महिलांना आरोग्य व पोषणाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तपासणी दरम्यान गंभीर आजार आढळलेल्या १४ नागरिकांना पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात संदर्भीत (Refer) करण्यात आले आहे.

‘ऑपरेशन रोशनी’ व सामाजिक कार्याचा धडाका

गडचिरोली पोलीस दलाने सन २०२१ पासून आतापर्यंत १७८ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ४०,०१५ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. याशिवाय ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत ९,९७१ नागरिकांची नेत्र तपासणी करून १,४१२ जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच ५ रक्तदान शिबिरांतून ४,३६१ युनिट रक्ताचे संकलन करून पोलीस दलाने सामाजिक कार्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

प्रशासनाचे यशस्वी नियोजन

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सीआरपीएफ कमांडंट शंभू कुमार, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली बिनागुंडा पोमकेचे प्रभारी अधिकारी सपोनि. रोहन पाटील, पोउपनि. रोहन शिरसाट, सागर मोरे, शुभम भगत व पोलीस अंमलदारांनी अथक परिश्रम घेतले.