गडचिरोली: 6 फेब्रुवारी
गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये अबुजमाडच्या घनदाट जंगलात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या थरारक चकमकीत पोलिसांनी ७ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी यांनी शौर्याने लढताना दोन माओवाद्यांना ठार केले, मात्र स्वतः वीरगती प्राप्त केली.
या चकमकीत एकूण ७ माओवादयांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले असून यामध्ये ०४ पुरुष आणि ०३ महिला माओवाद्यंचा समावेश आहे
२५ लाखांचे बक्षीस असलेला प्रभाकर (वेस्ट सब-झोनल ब्युरो प्रभारी) याला ठार कऱण्यात यश आले असून घटनास्थळावरून ३ ए.के.-४७, १ एस.एल.आर. आणि १ .३०३ रायफल अशी ५ शस्त्रे जप्त करण्यात आली आहे.
अभियानाचा थरार आणि यश
गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाने अबुजमाडच्या डोंगराळ भागात हे विशेष अभियान राबवले. या कारवाईत माओवाद्यांच्या ‘कंपनी क्रमांक १०’ चा प्रभारी आणि गडचिरोली विभागीय कमिटीचा महत्त्वाचा दुवा प्रभाकर (मूळ रा. कामारेड्डी, तेलंगणा) याचा खात्मा करण्यात आला आहे. प्रभाकरवर शासनाने २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
काल रात्रीपर्यंत ३ माओवाद्यांचे मृतदेह सापडले होते, तर आज दिवसभर चाललेल्या शोधमोहिमेत आणखी ४ (२ पुरुष व २ महिला) मृतदेह हाती लागले आहेत. अद्याप प्रभाकर व्यतिरिक्त इतर सहा माओवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
जवानाचे सर्वोच्च बलिदान
या मोहिमेत अहेरी येथील रहिवासी असलेले सी-६० जवान दीपक चिन्ना मडावी यांनी अतुलनीय शौर्य गाजवले. चकमकीदरम्यान त्यांनी दोन माओवाद्यांना कंठस्नान घातले, मात्र या लढाईत त्यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने त्यांना तात्काळ भामरागड येथे हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
याच मोहिमेत जोगा मडावी हे अन्य एक जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
उद्या होणार अधिकृत खुलासा
या मोठ्या कारवाईनंतर गडचिरोली पोलीस उद्या एका पत्रकार परिषदेचे आयोजन करणार आहेत. यामध्ये मारल्या गेलेल्या उर्वरित माओवाद्यांची नावे आणि या मोहिमेचा सविस्तर तपशील जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.



