चामोर्शी (प्रतिनिधी):
चामोर्शी तालुक्यातील फराडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विषय शिक्षिका सौ. प्रणिता प्रशांत कोटगीरवार यांची मूरमुरि येथे बदली झाली असून, त्यांच्या निरोप समारंभादरम्यान शाळा आणि गावकरी अक्षरशः भावूक झाले होते. गेल्या आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देणाऱ्या आणि त्यांच्याशी आपुलकीचे नाते जोडणाऱ्या कोटगीरवार मॅडम यांना निरोप देताना विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.
आठ वर्षांची सेवा, गहिवरलेला निरोप
सौ. प्रणिता कोटगीरवार या त्यांच्या सुस्वभावी, शांत आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वामुळे परिसरात लोकप्रिय होत्या. उद्यापासून त्या शिकवणार नाहीत, या कल्पनेने विद्यार्थी खूप खिन्न झाले होते. या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निरोप समारंभाचे आयोजन केले.
सत्कार सोहळा: माहेरची भेट
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षिकेला भेटवस्तू दिली. विशेष म्हणजे, शाळेतील सहकाऱ्यांनी सौ. प्रणिता कोटगीरवार यांना ‘माहेरची भेट’ म्हणून साडी-चोळी व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांचे पती श्री. प्रशांत कोटगीरवार यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर:
या निरोप समारंभाला शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर जुवारे, प्रमुख अतिथी राजू खेवले यांच्यासह कुनघाडकर सर, कोठारे मॅडम, कुमरे सर, कठाने मॅडम, तसेच गावातील पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुद्दटवार सर यांनी केले, सूत्रसंचालन कठाने मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोठारे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमातून शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमधील स्नेहबंधाचे दर्शन झाले.




