बलशाली सुसंघटित राष्ट्राच्या निर्मितीसाठी संघाची स्थापना : राजू गग्गूरी यांचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आल्लापल्ली मंडळाचा विजयादशमी उत्सव थाटात

0
2

अहेरी:6ऑक्टोबर

आपल्यावर ब्रिटीशांचे राज्य असताना, हिंदू समाजात एकता, शिस्त आणि राष्ट्राभिमान कमी पडत आहे, तसेच जातीय दंगली व अंतर्गत फूट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणून समाजाला एकत्रित करून एका बलशाली, सुसंघटित राष्ट्राची निर्मिती  करण्यासाठी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवारांनी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
देशभक्तीची भावना केवळ सणांपुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, यासाठी ‘शाखा’ या माध्यमातून शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. त्यातून व्यक्तीनिर्माण होऊन चारित्र्य संपन्न देश राष्ट्र घडावे असा त्यामागील उद्देश असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयं सेवक संघांचे जिल्हा कार्यवाह राजू गग्गूरी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आल्लापल्ली मंडळाचा श्री विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन समारंभ आलापल्ली येथील क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडला.त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाला आल्लापल्ली मातंग समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण जंगमवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जिल्हा संघचालक सुरेश गड्डमवार आणि तालुका कार्यवाह सफल शेंडे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना गग्गूरी म्हणाले,संघ नेहमीच ‘सेवा’ कार्याला सर्वोच्च प्राधान्य देतो. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी. स्वयंसेवक कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता सर्वात आधी मदतीसाठी उभे राहतात.सेवा भारती, विद्या भारती, एकल विद्यालय, वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या विविध संलग्न संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि आदिवासी व वंचित समाजाचे सक्षमीकरण करण्याचे कार्य संघ अनेक दशकांपासून करत आहे.​ फाळणीच्या वेळी बेघर झालेल्या लाखो निर्वासितांना स्वयंसेवकांनी निर्भीडपणे मदत करून राष्ट्राच्या ‘आत्म्याला’ बळकटी देण्याचे काम केले.संघ आता १०० वर्षांचा टप्पा पूर्ण करत आहे. हा प्रवास अनेक आव्हानांनी व्यापलेला असला तरी तो केवळ सामान्य जनतेच्या सहकार्यामुळेच सुखकर झाला.
शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघ देशभरात विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करणार आहे.देशाला परम वैभवाची स्थिती  येण्यासाठी समाज परिवर्तन आवश्यक आहे.


त्यासाठी संघाने पंच परिवर्तन हाती घेतले आहे.स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य, सामाजिक समरसता, पर्यावरन संरक्षण ह्या पाच मुदयांवर संघ या शताब्दी वर्षात काम करणार आहे.
त्यासाठी स्वयंसेवक घरोघरी जाऊन जनजागृती करतील आणि समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करतील.
यावेळी प्रमुख अतिथी लक्ष्मण जंगमवार यांचेही मार्गदर्शन झाले.
सांघिक गीत जयराम लोंनबले,वैयक्तिक गीत नारायन सिडाम, सुभाषित उमेश चिट्टीवार यांनी गायले तर मुख्य शिक्षक म्हणून कौस्तुभ गादेवार यांनी काम बघितले.

बॉक्स:
भरपावसात शिस्तबद्ध पथसंचलन, ठिकठिकाणी स्वागत.
उत्सवाच्या आधीच स्वयंसेवकांनी  भरपावसातही शिस्तबद्ध पथसंचलन  केले. हे संचलन क्रीडा संकुलापासून श्रीराम चौक, बसस्थानक, वीर बाबुराव चौक मार्गे श्रीराम मंदिरात जाऊन पुन्हा त्याच मार्गाने संकुलात परतले. विशेष म्हणजे, पथसंचलनाच्या मार्गावर राष्ट्रसेविका समितीच्या महिलांनी व नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.