मारोती सेलेरियोतून होणारी सुगंधित तंबाखूची तस्करी अहेरी पोलिसांनी रोखली.. एक आरोपी अटकेत ..

0
429

अहेरी –
अहेरी पोलिसांनी अवैध सुगंधित तंबाखूच्या तस्करीवर मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एक आरोपी अटकेत असल्याची माहिती अहेरी पोलिसांनी दिली असून ही कारवाई शुक्रवारी रात्री वांगेपल्ली गावाजवळील गेर्रा चौक परिसरात करण्यात आली.
विशेष म्हणजे गेल्या 29 एप्रिल रोजी आल्लापल्ली येथे 7.50 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त केला होता.त्याबरोबर ही सलग दुसरी कारवाई आहे.त्यामुळे अवैध सुगंधित तंबाखू तस्कर अहेरी पोलिसांच्या निशाण्यावर आले आहे.

आरोपीच्या ताब्यातील मारुती सेलेरीओ वाहनाची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असून, ते देखील जप्त करण्यात आले. यानुसार एकूण मुद्देमालाची किंमत ६,३६,६०० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी पराग अरविंद रामटेके (वय ३९, रा. सुलेझरी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर; सध्या रा. अहेरी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २७४, २७६ व २७७ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अहेरीचे पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सागर माने यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली.