गडचिरोली:2 सप्टेंबर
ग्रामपंचायत आलापल्ली अंतर्गत विविध समस्यांचे निराकरण व महत्वपुर्ण विषयांची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी अन्यथा येत्या 8 सप्टेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा माजी सरपंच अज्जू पठाण यांनी ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चाली गंजीवार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे,तेंदुपत्ता संकलन मजुरांचे थकित मानधन तत्काळ देण्यात यावे, गावातील नळयोजनेची चौकशी करण्यात यावी. तसेच पेसा अंतर्गत मागील तीन वर्षांतील निधीची माहिती जाहीर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
याआधी ही पठाण यांनी 13 ऑगस्ट रोजी वरील विषयावर माहिती मागितली होती. त्यासोबत 19 ऑगस्ट ला झालेल्या आमसभेत या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता मात्र त्यावर आलापल्ली ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रतिसाद न मिळाल्याने 25 ऑगस्ट ला माहितीच्या अधिकारा द्वारे माहिती मागितली आहे.
आलापल्ली ग्रामपंचायत अंतर्गत सन २०२४-२५ या हंगामातील तेंदुपत्ता संकलन केलेल्या मजुरांचे मेहनतिचे पैसे अद्याप देण्यात आले नाहीत.
सोबतच कोटयावधी रुपयेखर्चून तयार केलेली आलापल्ली गावातील नळ योजना बंद पडली असून, यासंदर्भात चौकशी व खुलासा करण्यात यावा.
पेसा अंतर्गत सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांतील शिल्लक निधी, मंजूर रक्कम व ग्रामपंचायतने केलेल्या विकासकामांचा सविस्तर अहवाल जनतेसमोर मांडावा.
माजी सरपंच अज्जू पठाण यांनी इशारा दिला आहे की, या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात ग्रामपंचायत कार्यालयाने तत्परता दाखवली नाही तर येत्या 8सप्टेंबर २०२५ रोजी अन्यायग्रस्त जनतेसह ग्रामपंचायत कार्यालय आलापल्ली समोर तीव्र आंदोलन व उपोषण करण्यात येईल.असा इशारा पठाण यांनी दिला आहे.




