
मिलिंद खोंड:19ऑक्टोबर
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरसान यांना मताधिक्य मिळाल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बूस्ट मिळाले असून या विधानसभा क्षेत्रावर दावा केला आहे. याच जोरावर एकेकाळी आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेसवर आज गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रावर दावा सांगण्याचा आत्मविश्वास मिळून पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आलापल्ली येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अहेरी विधानसभेची उमेदवारी आपण खेचून आणू नाहीतर मैत्री पूर्ण लढतीची तैयारी ठेवा असा संदेश काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता.
त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे विधानसभेची उमेदवारी कोणालाही मिळेल तरी काँग्रेसने ही सीट लढविण्याचा चंग बांधला आहे.त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये याठिकाणी बिघाडी निर्माण होऊ शकते .
राष्ट्रवादी शरद पवार गटा तर्फे ही भाग्यश्री आत्राम,माजी आ.दीपक आत्राम, युवा नेते संदीप कोरेत उमेदवारीच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे काँग्रेसची ही भूमिका कोणाला तारक की मारक ठरणार आहे हे येणारी वेळेस ठरवनार आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर लोकसभेत महायुती विरुद्ध महाआघाडी विधानसभा क्षेत्रात वरचढ राहिली आहे.
काँग्रेस तर्फे उमेदवारी साठी माजी वनाधिकारी हनुमंतू मडावी, माजी आ.पेंटा रामा तलांडी, सगुना तलांडी आदींनी .दावेदारी केली असली तरी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हात ज्यांच्यावर राहील त्यालाच काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळणार आहे त्यासोबतच विधानसभा समन्वयक अजय कंकडालवार यांचाही मोठा रोल यात राहणार आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासोबतच बूथ मॅनेजमेंट करण्यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्र निहाय प्रशिक्षणाचा कार्यक्रम वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्फतीने सुरू झालेला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनतेपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचून महायुती सरकाराच्या कारभाराविरोधात जनाधार मिळवण्याचे काम होणार आहे.
महायुती व महाआघाडी मध्येअहेरी विधानसभा क्षेत्रात ऑल इज वेल नसल्यामुळे या ठिकाणी बहुरंगी लढत बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक मत हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे .त्यामुळे लोकसभेत आत्मविश्वास दुणावलेले काँग्रेस कार्यकर्ते लोकसभेप्रमाणे विधानसभेतही या क्षेत्रात त्याच जोमाने काम करणार काय? याकडे लक्ष लागले आहे. त्यासोबतच दिलेल्या उमेदवाराला विजयी करून या ठिकाणी काँग्रेस आपला झेंडा फडकवते काय?हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



