गडचिरोली, दि.३ ऑगस्ट
गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या हिताला बाधा आणणारे वित्त व लेखा विभागाने दिनांक ०१ जुलै २०२६ रोजी निर्गमित केलेले अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
या संदर्भात संघटनेच्या वतीने दिनांक १५ जुलै २०२६ रोजी मा. कुलगुरू महोदयांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. सदर परिपत्रकामुळे विद्यापीठातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये अनावश्यक दरी निर्माण होऊन कार्यालयीन वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. तसेच, सदर परिपत्रक मागे न घेतल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची पूर्वकल्पनाही प्रशासनास देण्यात आली होती.
त्यानंतर संघटनेच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात आले. दिनांक २२ जुलै २०२६ रोजी वित्त व लेखा विभागाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून संबंधित परिपत्रकाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. त्यानंतर दिनांक २८ जुलै २०२६ रोजी मा. कुलगुरू महोदयांच्या कार्यालयासमोर प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागाने जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रशासनासोबत चर्चा करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या ठामपणे मांडल्या.
संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या अभूतपूर्व एकजुटीला अखेर यश आले असून, विद्यापीठ प्रशासनाने दिनांक ०१ जुलै २०२६ रोजीचे संबंधित अन्यायकारक परिपत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता दूर होऊन, त्यांच्या दरमहा वेतनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे. हा विजय कोणत्याही एका व्यक्तीचा नसून, गोंडवाना विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या संघर्षाचा विजय आहे.
याबाबत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सचिव तथा अधिसभा सदस्य श्री. सतीश पडोळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात का होईना, परंतु कर्मचाऱ्यांच्या रास्त मागणीला अखेर यश मिळाले आहे. हा विजय विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकजुटीचा आणि सामूहिक संघर्षाचा आहे. संघटनेच्या या लढ्याला भक्कम पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”
या पार्श्वभूमीवर, संबंधित परिपत्रक रद्द झाल्याने गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरू असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. आंदोलनाच्या काळात सक्रिय सहभाग नोंदवून संघटनेच्या भूमिकेला भक्कम पाठबळ देणाऱ्या विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी बांधवांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

तसेच, भविष्यातही विद्यापीठातील कर्मचारी वर्गाच्या अस्तित्वावर, स्वाभिमानावर किंवा न्याय्य हक्कांवर घाला घालण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास, सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांची हीच अभेद्य एकजूट कायम ठेवून लोकशाही व सनदशीर मार्गाने संघर्ष करण्यात येईल, असा निर्धार गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
— गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना, गडचिरोली




