गडचिरोली : 17 डिसेंबर.
दुबईत झालेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाची दिव्यांग धनुर्धर श्वेता मंजू भास्कर कोवे हिने सुवर्णपदक पटकावले. ती आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्वेताने उत्कृष्ट सादरीकरण करत वैयक्तिक प्रकारात सुवर्ण, तर मिश्र प्रकारात कास्यपदक पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत श्वेताने भारतासह गोंडवाना विद्यापीठाचे आणि गडचिरोली जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. उत्कृष्ट कौशल्य, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर श्वेताने हे यश संपादन केले. ग्रामीण व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचून सुवर्णपदकापर्यंत मजल मारणे हे जिल्हावासियांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबीय, महाविद्यालयीन तसेच विद्यापीठ प्रशासनाचे मोलाचे सहकार्य तिला लाभले आहे.
एशियन यूथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक विजेती कु. श्वेता कोवेचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथील विद्यार्थिनी कु. श्वेता भास्कर कोवेचे नागपूर विमानतळावर अब्दुल जमीर हकीम (बबलू भैया) व सौ. शाहीन ताई हकीम यांच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले. या यशामुळे सर्वत्र अभिमानाचे वातावरण आहे




