आलापल्ली येथे मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींच्या हस्ते उपोषणाची सांगता.
अहेरी :-
आपल्या हक्काच्या प्रलंबित वेतनासाठी आलापल्ली येथे गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या वनमजुरांच्या साखळी उपोषणाची अखेर यशस्वी सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याने आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे ओएसडी अनिरुद्ध पालकर व माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वनमजुरांच्या मागणीला न्याय मिळाला. विशेष म्हणजे, ओएसडी अनिरुद्ध पालकर यांनी थेट उपोषणस्थळी भेट देत वनमजुरांना पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविले. त्याचबरोबर वनमजुरांच्या खात्यात प्रलंबित वेतन जमा झाल्याने आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आलापल्ली येथे वनमजुरांचे अनेक महिन्यांपासूनचे वेतन प्रलंबित असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाल्याने वारंवार मागणी करूनही वेतनाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने वनमजुरांनी साखळी उपोषणाचे हत्यार उपसले होते. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळातही आपल्या कष्टाचा मोबदला मिळवण्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागले. तब्बल १२ दिवस चाललेल्या या आंदोलनामुळे वनमजुरांच्या प्रश्नाचे गांभीर्य अधोरेखित झाले होते.
दरम्यान, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच वनमजुरांनी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. वनमजुरांची परिस्थिती आणि प्रलंबित वेतनाचा प्रश्न लक्षात घेऊन राजे अम्ब्रिशराव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी अनिरुद्ध पालकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. वनमजुरांवर ओढवलेले आर्थिक संकट आणि त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्या वनमजुरांशी जवळपास अर्धा ते एक तास संवाद साधला. त्यांच्या समस्या, प्रलंबित वेतन आणि आंदोलनामागील भूमिका जाणून घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दखलीनंतर ओएसडी अनिरुद्ध पालकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आलापल्ली येथील उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देत आंदोलक वनमजुरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वनमजुरांना पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडविले. तसेच वनमजुरांच्या खात्यात प्रलंबित वेतन जमा झाल्याने गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले आणि साखळी उपोषणाची सांगता झाली.
वनमजुरांच्या हक्काच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केलेला पाठपुरावा आणि ओएसडी अनिरुद्ध पालकर यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून घेतलेली दखल यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाच्या संवेदनशील भूमिकेचे दर्शन घडले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वेतनासाठी संघर्ष करणाऱ्या वनमजुरांना अखेर दिलासा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.




