उद्याला आल्लापल्लीत महावितरणवर आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंच देणार धडक.

0
1
Oplus_16908288

शेतकऱ्यांवरील वीज बिल वसुलीची सक्ती थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयावर मोर्चा; कैलास कोरेत यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन

आल्लापल्ली:

महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य वीज ग्राहकांना आकारण्यात येणारी वाढीव वीज बिले, दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुलीसाठी केली जाणारी सक्ती आणि दुर्गम भागातील वीज पुरवठ्याच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी आलापल्लीत महावितरण कंपनीच्या कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंच, आलापल्लीचे नेतृत्व कैलास कोरेत करणार आहेत.

अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या पटांगणातून दुपारी १२ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर वीर बाबुराव शेडमाके चौक मार्गे मोर्चा महावितरण कंपनीच्या आलापल्ली येथील कार्यालयावर धडकणार असून, तेथे संबंधित अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करून मोर्चाची सांगता करण्यात येणार आहे.

महावितरणकडून सर्वसामान्य ग्राहकांना आकारण्यात येणारी वाढीव वीज बिले कमी करावीत, अशी प्रमुख मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सध्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत असून, अशा परिस्थितीत त्यांच्यावर वीज बिल भरण्यासाठी सक्ती करू नये, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी पुढे केली आहे.

याशिवाय महावितरण कंपनीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमानुसार बोनस देण्यात यावा, अती दुर्गम व आदिवासीबहुल भागातील वीज ग्राहकांच्या विविध समस्या तातडीने सोडवाव्यात, तसेच या भागातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश असणार आहे.

. सर्वसामान्य वीज ग्राहकांना आकारण्यात येणारी वाढीव वीज बिले कमी करावीत.,दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सक्ती करू नये., महावितरण कंपनीतील कार्यरत कर्मचाऱ्यांना नियमानुसार बोनस देण्यात यावा.,अती दुर्गम व आदिवासीबहुल भागातील वीज ग्राहकांच्या समस्या सोडवून वीज पुरवठा नियमित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. वरील मागण्यांसह जनहिताशी संबंधित इतर प्रलंबित प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा.

वाढीव वीज बिलांचा प्रश्न, शेतकऱ्यांवरील आर्थिक भार आणि दुर्गम भागातील वीज समस्यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, या उद्देशाने या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या आंदोलनाकडे परिसरातील वीज ग्राहक, शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजक समिती कडून करण्यात आले आहे.