अखेर शेतकऱ्यांचे आष्टी येथील चक्काजाम आंदोलन मागे; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला यश!

0
1

गडचिरोली, ४ नोव्हेंबर:

मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आष्टी येथे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. येणापूर–जयरामपूर परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात १३ गावांतील शेतकऱ्यांनी प्रकल्पाधिन जमीन वगळण्याच्या मागणीसाठी आष्टी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३-सी वर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनामुळे चंद्रपूर आणि गडचिरोलीकडील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मध्यरात्री झाली चर्चा

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांना आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार, पालकर यांनी मध्यरात्रीच आंदोलनस्थळी पोहोचून शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मुख्यमंत्र्यांचे आवाहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यानंतर, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महामार्गावरील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे प्रयत्न

मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा होईपर्यंत संबंधित भूसंपादन प्रक्रिया पूर्णपणे स्थगित ठेवण्यात आली असून, सध्या त्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. याशिवाय, स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आदल्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.

आंदोलन यशस्वीरीत्या मागे घेतल्यानंतर पोलीस प्रशासनामार्फत आंदोलकांना सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली. आता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत आणि सुरळीत सुरू झाली आहे.